जयजयकारात दुमदुमले निघोज; माता मळगंगा घागर मिरवणूक लाखो भाविकांच्या साक्षीने भक्तिभावात संपन्न
जयजयकारात दुमदुमले निघोज; माता मळगंगा घागर मिरवणूक लाखो भाविकांच्या साक्षीने भक्तिभावात संपन्न

जयजयकारात दुमदुमले निघोज; माता मळगंगा घागर मिरवणूक लाखो भाविकांच्या साक्षीने भक्तिभावात संपन्न
निघोज- दिनांक 11 एप्रिल
निघोज नगरीत माता मळगंगा देवीच्या यात्रेनिमित्त पारंपरिक घागर मिरवणूक यंदा अत्यंत भव्य, दिव्य आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाली. “जय मळगंगा माता”च्या अखंड जयजयकारात, सनई-चौघड्यांच्या सुरेल निनादात आणि सपना ढोल-ताशांच्या गजरात संपूर्ण गाव अक्षरशः दुमदुमून गेले होते. प्रत्येक गल्ली, प्रत्येक चौक भक्तांच्या उसळत्या जनसागराने फुलून गेला होता.
परंपरेनुसार माता मळगंगेची पवित्र घागर आकर्षक पद्धतीने सजवून मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला. या घागरीचा मानाचा मान माता मळगंगेचे पुजारी विकास गायखे यांच्या डोक्यावर देण्यात आला. डोक्यावर पवित्र घागर घेऊन त्यांनी गावातील प्रमुख मार्गांवरून वाजत-गाजत मिरवणूक काढली. त्यांच्या मागोमाग ढोल-ताशांच्या तालावर नाचणारे तरुण, सनई-चौघड्यांच्या सुरांत हरवलेले वादक, तसेच पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेल्या महिलांनी या सोहळ्याला अप्रतिम सांस्कृतिक आणि धार्मिक रंग चढवला.
मिरवणुकीदरम्यान ठिकठिकाणी “जय मळगंगा माता”च्या घोषणांनी आकाश भारावून गेले होते. भाविकांनी घागरीचे दर्शन घेत नतमस्तक होत आपली श्रद्धा व्यक्त केली. महिलांच्या ओवाळलेल्या घागरी, भजन-कीर्तन, फुगड्या आणि भक्तिगीतांमुळे वातावरण अधिकच मंगलमय झाले होते.
संपूर्ण गावातून मिरवणूक पार पडल्यानंतर पुजारी विकास गायखे यांच्या हस्ते माता मळगंगेच्या घागरेची विधिवत पूजा करण्यात आली. मंत्रोच्चार, आरती आणि पारंपरिक धार्मिक विधींनी हा सोहळा अधिकच पवित्र झाला. त्यानंतर अत्यंत श्रद्धा आणि भक्तिभावाने ही पवित्र घागर माता मळगंगेच्या बारवेत विसर्जित करण्यात आली. या क्षणी लाखो भाविकांच्या जयघोषात एकच जल्लोष उसळला आणि संपूर्ण परिसर भक्तिरंगात रंगून गेला.
माता मळगंगेच्या पूजेचा मान हा परंपरेने गायखे कुटुंबाला लाभलेला असून, या मानाच्या परंपरेचे जतन आजही अत्यंत निष्ठेने केले जात आहे. गायखे कुटुंबाच्या हस्ते पार पडणारी ही पूजा भाविकांसाठी विशेष श्रद्धास्थान मानली जाते.
या भव्य सोहळ्यास अहिल्यानगर दक्षिणचे खासदार डॉ. लोकनेते निलेशजी लंके साहेब तसेच पारनेरचे आमदार काशिनाथ दाते सर यांनी उपस्थित राहून माता मळगंगेच्या घागरीचे दर्शन घेतले. त्यांनी या अद्वितीय परंपरेचे जतन करणाऱ्या ग्रामस्थांचे कौतुक केले.
यंदा या सोहळ्यास तब्बल तीन ते चार लाख भाविकांनी हजेरी लावल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक मोठ्या संख्येने निघोजमध्ये दाखल झाले होते. मंदिर परिसर, बारवेचा परिसर आणि गावातील सर्व मार्ग भाविकांनी गजबजून गेले होते.
या सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्ट, ग्रामपंचायत निघोज, समस्त ग्रामस्थ, मुंबईकर मंडळ व यात्रा कमिटी यांनी एकजुटीने परिश्रम घेतले. तर पारनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोषी खेडकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवत लाखोंच्या गर्दीतही कायदा व सुव्यवस्था अबाधित राखली.
एकंदरीत, माता मळगंगा घागर मिरवणूक हा केवळ धार्मिक सोहळा नसून श्रद्धा, परंपरा, संस्कृती आणि ग्रामएकात्मतेचा भव्य सोहळा ठरला. जयजयकार, ढोल-ताशांचा गजर आणि भक्तांच्या अपार श्रद्धेमुळे यंदाचा सोहळा निघोजच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवला जाईल, यात शंका नाही.




