अहिल्यानगर ✍️ अहमदनगरनिघोजमहाराष्ट्र

इतिहास नवी मुंबईचा’ ग्रंथ ठरतोय इतिहास अभ्यासकांसाठी मार्गदर्शक

इतिहास नवी मुंबईचा’ ग्रंथ ठरतोय इतिहास अभ्यासकांसाठी मार्गदर्शक

‘इतिहास नवी मुंबईचा’ ग्रंथ ठरतोय इतिहास अभ्यासकांसाठी मार्गदर्शक
अमृत पाटील नेरुळकर यांच्या ग्रंथाला साहित्यिक, इतिहास अभ्यासकांकडून दाद
निघोज – प्रतिनिधी दिनांक 28 मे
स्थलवर्णनपर इतिहास हा ज्ञानवर्धक आणि रंजक विषय मानला जातो. एखाद्या शहराचा भूगोल, संस्कृती, सामाजिक जीवन, परंपरा, इतिहास आणि परिवर्तनाचा प्रवास उलगडून दाखविणारे ग्रंथ समाजासाठी मौल्यवान ठरतात. हिंदीतील डॉ. मोतीचंद्र यांचा काशी का इतिहास, मराठीतील गो. ना. माडगावकर यांचे मुंबई वर्णन तसेच ना.वि. जोशी यांचे पुणे वर्णन या परंपरेतीलच एक महत्त्वपूर्ण भर म्हणजे अमृत पाटील नेरुळकर लिखित ‘इतिहास नवी मुंबईचा’ हा ग्रंथ होय.
नवी मुंबई हे आधुनिक नियोजनातून उभे राहिलेले शहर असले तरी या शहराला भूगोल आहे; मात्र इतिहास नाही, अशी टीका अनेकदा केली जात होती. ही उणीव भरून काढण्याचे महत्त्वपूर्ण कार्य नवी मुंबई महानगरपालिकेतील संगीत शिक्षक अमृत पाटील नेरुळकर यांनी केले आहे. इतिहासाचा शास्त्रीय अभ्यास नसतानाही जिद्द, अभ्यासू वृत्ती आणि सामाजिक बांधिलकीच्या जोरावर त्यांनी नवी मुंबईचा सर्वसमावेशक इतिहास वाचकांसमोर आणला आहे.
या ग्रंथाची पहिली आवृत्ती ३ जानेवारी २०२२ रोजी प्रकाशित झाली होती. वाचकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर दुसरी आवृत्ती १ जानेवारी २०२५ रोजी प्रकाशित करण्यात आली. ग्रंथाच्या प्रकाशिका आदिती अमृत पाटील असून निर्मिती संकल्पना नंदकुमार म्हात्रे यांची आहे. तब्बल ३०४ पृष्ठांचा हा हार्डबाऊंड ग्रंथ उच्च प्रतीच्या कागदावर आकर्षक स्वरूपात प्रकाशित करण्यात आला आहे. सुरुवातीला रंगीत छायाचित्रे, त्यानंतर संपूर्ण ग्रंथभर प्रसंगानुरूप कृष्णधवल छायाचित्रे आणि आवश्यकतेनुसार नकाशे देण्यात आले आहेत.
या ग्रंथाला ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांची प्रस्तावना लाभली असून डॉ. अविनाश पाटील यांनी मार्गदर्शक ठरेल असे आशिर्वचन दिले आहे. लेखकानेही आपल्या मनोगतातून या इतिहासलेखनामागील प्रेरणा स्पष्ट केली आहे. संपूर्ण ग्रंथाची ३८ प्रकरणांत विभागणी करण्यात आली असून शेवटी संदर्भग्रंथांची विस्तृत यादी देण्यात आली आहे. त्यामुळे या ग्रंथासाठी लेखकाने घेतलेले परिश्रम अधोरेखित होतात.
ग्रंथामध्ये नवी मुंबईच्या भौगोलिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक पैलूंवर सखोल प्रकाश टाकण्यात आला आहे. ब्रिटिश काळात साष्टी भागाचे विभाजन, ठाणे परिसराची रचना, सह्याद्री पर्वतरांगांपासून अरबी समुद्राच्या खाडीपर्यंतचा विस्तार, तसेच ठाणे व रायगड जिल्ह्यांच्या सीमांमधील नवी मुंबईचा भूभाग याचे तपशीलवार वर्णन लेखकाने केले आहे.
या परिसरात मुख्यतः आगरी व कोळी समाजाचे वास्तव्य असून त्यांच्या जीवनशैली, परंपरा, व्यवसाय, धार्मिक व सांस्कृतिक वारशाचे प्रभावी चित्रण ग्रंथात करण्यात आले आहे. मीठ उत्पादन, शेती आणि मत्स्य व्यवसाय हे येथील प्रमुख व्यवसाय असल्याचेही लेखकाने नमूद केले आहे.
बेलापूर, वाशी, नेरुळ यांसारख्या गावांच्या नावामागील इतिहासही ग्रंथात रंजक पद्धतीने मांडण्यात आला आहे. बेलापूर येथे बेलाची झाडे मोठ्या प्रमाणात असल्याने त्या गावाला ‘बेलापूर’ हे नाव पडल्याचा उल्लेख आहे. तर वाशी गावाच्या संदर्भात “काशीला जावे; पण वाशीला जाऊ नये” ही प्रचलित म्हण कशी उदयास आली, याचे गमतीशीर वर्णन लेखकाने केले आहे. पूर्वी वाशी गावात जाण्यासाठी जलमार्गाशिवाय दुसरा पर्याय नव्हता. भरतीच्या वेळी गावाचा संपर्क पूर्णपणे तुटत असे. त्यामुळे बाहेरील गावांतील लोक सोयरिकीसाठीही कचरत असत, असा उल्लेख या ग्रंथात आढळतो.
ग्रंथातील “परिचय थोरांचा…” हे प्रकरण विशेष लक्षवेधी ठरते. आगरी-कोळी समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अनेक मान्यवरांचा परिचय या प्रकरणातून करून देण्यात आला आहे. समाजधुरीण गणपतशेठ तांडेल, बहुआयामी नारायणशेठ नाईक, शिक्षणमहर्षी सीताराम मास्तर, थोर देशभक्त दत्ताजी ताम्हाणे, रणरागिणी कावेरीताई पाटील, भजनसम्राट हंसारामबुवा नेरुळकर, शाहीर दामोदर विटावकर यांसारख्या व्यक्तिमत्त्वांची माहिती वाचकांना प्रेरणादायी ठरते.
भूमिपुत्रांचे जमीन बचाव आंदोलन यशस्वी करणारे दि. बा. पाटील यांच्याविषयीही सविस्तर माहिती देण्यात आली आहे. याशिवाय सिडको भवन आणि नवी मुंबई महानगरपालिकेच्या उभारणीचा इतिहासही या ग्रंथात समाविष्ट करण्यात आला आहे.
ग्रंथाच्या शेवटी ठाणे तालुक्यातील स्वातंत्र्यसैनिकांची यादी देण्यात आली असून इतिहास संशोधकांसाठी ती महत्त्वपूर्ण ठरते. नवी मुंबईच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय प्रवासाचा मागोवा घेणारा हा ग्रंथ इतिहास अभ्यासक, संशोधक, विद्यार्थी आणि सर्वसामान्य वाचकांसाठी उपयुक्त संदर्भग्रंथ ठरत आहे.
नवी मुंबईचा सर्वसमावेशक स्थलवर्णनपर इतिहास मांडून अमृत पाटील नेरुळकर यांनी इतिहास अभ्यासकांसाठी मोठी सोय करून ठेवली असून हा ग्रंथ भविष्यातील संशोधनासाठीही मार्गदर्शक ठरेल, अशी भावना साहित्यप्रेमींकडून व्यक्त होत आहे.
– नाना ढवळे

योगेश खाडे

योगेश खाडे पाटील हे स्टार वन न्युज मराठी चे जुन्नर तालुक्यातील एक अनुभवी पत्रकार आहे ✨ जिथे अन्याय होत असेल तिथे त्यांना मदत करण्याचे काम योगेश खाडे करताना दिसतात

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!