मराठी सुभाषितांचा ठेवा म्हणजे संस्कारांची अमूल्य शिदोरी : नाना ढवळे
मराठी सुभाषितांचा ठेवा म्हणजे संस्कारांची अमूल्य शिदोरी : नाना ढवळे

मराठी सुभाषितांचा ठेवा म्हणजे संस्कारांची अमूल्य शिदोरी : नाना ढवळे
संत, पंडित आणि आधुनिक कवींनी मराठी भाषेला दिले विचारवैभवाचे दालन
निघोज, दि. २३ मे (प्रतिनिधी / योगेश खाडे) : मराठी भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नसून संस्कार, विचार आणि जीवनमूल्यांची समृद्ध परंपरा जपणारी भाषा आहे. मराठी भाषेचे खरे वैभव म्हणजे सुभाषिते असून ती समाजाला विचारांची दिशा देणारी अमूल्य संपत्ती आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यप्रेमी नाना ढवळे यांनी केले.
सुभाषित म्हणजे सुंदर, सारगर्भ आणि काव्यमय पद्धतीने व्यक्त केलेला सुविचार होय. अल्प शब्दांत मोठा आशय व्यक्त करणाऱ्या या छंदोबद्ध रचना मराठी साहित्याचा अमूल्य ठेवा असल्याचे नाना ढवळे यांनी सांगितले. संत साहित्य, पंडित काव्य आणि आधुनिक कवितांमधून मराठी भाषेला असंख्य सुभाषितांचा खजिना लाभला असून ती आजही समाजाला प्रेरणा देत आहेत.
नाना ढवळे म्हणाले की,
“सुश्लोक वामनाचा, अभंगवाणी प्रसिद्ध तुकयाची।
ओवी ज्ञानेशाची किंवा आर्या मयूरपंतांची॥”
हे सुभाषित मराठी साहित्याची समृद्ध परंपरा अधोरेखित करणारे आहे. पंडित वामन कवींचे श्लोक, संत तुकारामांचे अभंग, संत ज्ञानेश्वरांच्या ओव्या आणि मोरोपंतांच्या आर्या यांमधून जीवनमूल्यांचा खजिना समाजाला प्राप्त झाला आहे.
संत साहित्यामधून समाजप्रबोधन
संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत एकनाथ, समर्थ रामदास, संत तुकाराम आदी संतांनी आपल्या रचनांमधून समाजप्रबोधन केले. त्यांच्या सुभाषितांमध्ये अध्यात्म, नैतिकता, व्यवहारज्ञान आणि जीवनाचे वास्तव प्रभावीपणे मांडले गेले आहे.
“जववरी रे तववरी जंबूक करी गर्जना
जव त्या पंचानना देखिले नाही रे बाप”
या संत ज्ञानेश्वरांच्या ओवीतून खोटा अहंकार आणि दिखाऊपणावर प्रहार करण्यात आला आहे. तर समर्थ रामदासांचे,
“सदा सर्वदा योग तूझा घडावा
तुझे कारणी देह माझा पडावा”
हे सुभाषित भक्ती, समर्पण आणि कर्तव्यभावना शिकवणारे असल्याचे नाना ढवळे यांनी नमूद केले.
तुकाराम, मोरोपंत आणि वामन पंडितांचे विचारवैभव
“गाठ पडली ठका ठका
त्याचे वर्म जाणे तुका”
या संत तुकारामांच्या अभंगातील ओळी अनुभवातून येणाऱ्या ज्ञानाचे महत्त्व सांगतात. तसेच मोरोपंतांचे,
“सुसंगती सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो
कलंक मतिचा झडो, विषय सर्वथा नावडो”
हे सुभाषित चांगल्या संगतीचे महत्त्व अधोरेखित करणारे आहे.
वामन पंडितांच्या,
“कठिण समय येता कोण कामास येतो”
या ओळीतून संकटसमयी खऱ्या माणसांची ओळख पटते, असा जीवनार्थ व्यक्त होतो.
आधुनिक कवींनीही पुढे नेली सुभाषितांची परंपरा
महाकवी ग.दि.माडगूळकर, विंदा करंदीकर, ना.घ.देशपांडे यांसारख्या आधुनिक कवींनीही मराठी साहित्यात सुभाषितांची समृद्ध परंपरा जपली आहे.
“दोन ओंडक्यांची होते सागरात भेट
एक लाट तोडी दोघां पुन्हा नाही गांठ”
या ग.दि.माडगूळकरांच्या ओळी जीवनातील नातेसंबंधांचे वास्तव मांडतात. तर विंदा करंदीकरांचे,
“देणाऱ्याने देत जावे
घेणाऱ्याने घेत जावे”
हे सुभाषित उदारता आणि जीवनतत्त्वज्ञान शिकवणारे असल्याचे नाना ढवळे यांनी सांगितले.
सुभाषितांमुळे व्यक्तिमत्त्वाला मिळते वेगळी ओळख
दैनंदिन संभाषणात, व्याख्यानांमध्ये किंवा लिखाणात सुभाषितांचा वापर केल्यास विचार अधिक प्रभावी, अर्थपूर्ण आणि आकर्षक बनतात. सुभाषितांमुळे व्यक्तिमत्त्व खुलते आणि चारचौघांत वेगळी ओळख निर्माण होते. नव्या पिढीने मराठी सुभाषितांचा अभ्यास करून त्यांचा जीवनात उपयोग करावा, असे आवाहन नाना ढवळे यांनी केले.
मराठी सुभाषिते ही केवळ साहित्यसंपदा नसून समाजाला संस्कार, विचार आणि जीवनदृष्टी देणारी प्रेरणादायी परंपरा आहे, असे मत शेवटी नाना ढवळे यांनी व्यक्त केले.




