डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य जगात महान – आमदार काशिनाथ दाते निघोज – दिनाक 15 एप्रिल
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य जगात महान – आमदार काशिनाथ दाते निघोज - दिनाक 15 एप्रिल

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य जगात महान – आमदार काशिनाथ दाते
निघोज – दिनाक 15 एप्रिल
महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानाची निर्मिती करून देशाची कीर्ती जगभर पोहोचवली असून त्यांचे कार्य मानवतेसाठी आदर्शवत आणि युगप्रवर्तक असल्याचे प्रतिपादन आमदार काशिनाथ दाते यांनी केले.
निघोज येथील त्रिरत्न बुद्ध विहार परिसरात मंगळवार दि. १४ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती संघ मुंबई व निघोज ग्रामस्थांच्या वतीने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी प्रमुख उपस्थितीत आमदार दाते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष सुभाष सोनवणे होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी पंचायत समितीचे माजी सदस्य शंकरराव नगरे, सरपंच चित्राताई वराळ पाटील, कांचनताई म्हस्के, कोमलताई भंडारी, पंकज कारखिले, राहुल सुकाळे, उपसरपंच ज्ञानेश्वर वरखडे, राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या जिल्हा कार्याध्यक्षा सुधामती कवाद आदींसह परिसरातील ग्रामस्थ व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार दाते म्हणाले, “भारतीय संविधान हे जगातील सर्वोत्तम संविधान असून त्यात सर्वसामान्यांना न्याय देण्याची अफाट ताकद आहे. महिलांना सर्वाधिक अधिकार संविधानामुळेच प्राप्त झाले आहेत. या संविधानामुळेच भारतीय लोकशाही जगात अग्रस्थानी आहे.” पुढे त्यांनी कुरुंद येथील आंबेडकर नगर विकासासाठी २५ लाख रुपये, चोंभूत येथे २० लाख रुपये तसेच निघोज येथील बुद्ध विहार परिसरात सभागृह व जिमसाठी साहित्य उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली.
कार्यक्रमात विविध गावांतील सरपंच, उपसरपंच व पदाधिकाऱ्यांचा संविधानाची प्रत देऊन सत्कार करण्यात आला. तसेच ज्येष्ठ नागरिक व माता भगिनींचा गौरव करण्यात आला. उत्कृष्ट भाषण करणाऱ्या बालचमू व महिला भगिनींनाही सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हिरामण सोनवणे यांनी केले तर आभार प्रदर्शन बबनराव सोनवणे व दिलीप सोनवणे यांनी केले.
चौकट : दिवसभर विविध कार्यक्रमांची रेलचेल
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी अभिवादन व मानवंदना, दुपारी जाहीर कार्यक्रम, समाजातील ज्येष्ठ व महिला भगिनींचा सत्कार, गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव, तसेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.
सायंकाळी सहा ते नऊ वाजेपर्यंत सवाद्य व विद्युत रोषणाईने सजवलेल्या रथातून डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याची भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत समाजबांधवांनी निळे फेटे तर महिलांनी पांढऱ्या साड्या परिधान करून उत्साहपूर्ण सहभाग नोंदविला. “जय भीम”, भगवान बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. रात्री त्रिरत्न बुद्ध विहार येथे मिरवणुकीची सांगता झाली.
चौकट : ५२ वर्षांची परंपरा – प्रथमच लोकप्रतिनिधींची उपस्थिती
१९७४ साली स्थापन झालेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती संघ मुंबई या संघटनेच्या माध्यमातून गेल्या ५२ वर्षांपासून जयंती उत्साहात साजरी केली जात आहे. मात्र यंदा प्रथमच आमदार काशिनाथ दाते यांच्या रूपाने तालुक्याचे लोकप्रतिनिधी या सोहळ्यास उपस्थित राहिल्याने संघटनेच्या वतीने विशेष आनंद व्यक्त करण्यात आला.
अध्यक्ष सुभाष सोनवणे व त्यांच्या सहकाऱ्यांनी आमदार दाते यांचे आभार मानले. अल्पसंख्याक समाजासाठी सातत्याने कार्य करणारे लोकप्रतिनिधी म्हणून विविध वक्त्यांनी आमदार दाते यांचा गौरवोद्गार काढत त्यांच्या कार्याची प्रशंसा केली.




