
Updated by स्टार वन न्युज मराठी ™
2 एप्रिल 2026
वर्धा जिल्ह्यात एक अत्यंत सुन्न करणारी घटना उघडकीस आली आहे. एका पतीने आपल्या दोन वर्षांच्या निष्पाप चिमुकल्यासमोरच पत्नीचा गळा आवळून तिचा अंत केला. ही धक्कादायक घटना धावत्या कारमध्ये घडली असून, यानंतर आरोपी पतीने पुरावा नष्ट करण्यासाठी थेट मध्य प्रदेश गाठले आणि पत्नीचा मृतदेह पेंच नदीत फेकून दिला. तब्बल चार दिवसांनंतर या भयंकर गुन्ह्याचा पर्दाफाश झाला असून, पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवत आरोपी पतीला बेड्या ठोकल्या आहेत.✍️✍️

या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव अक्षय देवराव चोरपगार (वय २७ वर्षे) असे आहे. तो मूळचा अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील गोळेगाव येथील रहिवासी आहे. सध्या तो वर्धा जिल्ह्यातील सेलू नजीक असलेल्या मोर्चापूर येथे वास्तव्यास होता. प्राप्त माहितीनुसार अक्षय हा सैन्यात कार्यरत आहे. अक्षय आणि प्रणिता यांचा काही वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. मात्र, या विवाहाला घरच्यांचा तीव्र विरोध असल्याने तो आपल्या मूळ गावापासून दूर राहत होता. काही कौटुंबिक कारणांमुळे त्याची पत्नी प्रणिता ही गेल्या दीड ते दोन वर्षांपासून अकोला जिल्ह्यातील मुर्तिजापूर तालुक्यातील दाताळा येथे आपल्या माहेरी राहत होती. या दाम्पत्याला दोन वर्षांचा एक लहान मुलगा देखील आहे.
माहेरी असलेल्या पत्नीला आणि मुलाला पुन्हा आपल्या गावी घेऊन येण्यासाठी २२ मार्च रोजी अक्षय कारने दाताळा येथे गेला होता. दुसऱ्या दिवशी म्हणजेच २३ मार्च रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास तो पत्नी आणि मुलाला घेऊन परतीच्या प्रवासाला निघाला होता. ते मोर्चापूर येथे येत असताना वाटेत केळझर गावाजवळ पती-पत्नीमध्ये अचानक शाब्दिक वाद सुरू झाला. या वादाचे रूपांतर इतक्या टोकाच्या भांडणात झाले की, रागाच्या भरात अक्षयने कारमध्येच पत्नीचा गळा आवळला आणि तिचे जीवन संपवले. अत्यंत दुर्दैवी बाब म्हणजे यावेळी त्यांचा दोन वर्षांचा मुलगा त्याच कारमध्ये उपस्थित होता.
या घटनेनंतर स्वतःचा बचाव करण्यासाठी आणि पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने अक्षयने पत्नीचा मृतदेह थेट मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील अमरवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या पेंच नदीत फेकून दिला. एवढेच नाही तर कोणालाही संशय येऊ नये म्हणून त्याने नागपूर जिल्ह्यातील सोनेगाव पोलीस ठाण्यात जाऊन आपली पत्नी बेपत्ता असल्याची खोटी तक्रार देखील नोंदवली. जेव्हा प्रणिताच्या नातेवाईकांनी तिच्याबद्दल अक्षयकडे विचारपूस केली, तेव्हा त्याने उडवाउडवीची आणि दिशाभूल करणारी उत्तरे दिली. यामुळे नातेवाईकांचा संशय बळावला. त्यांनी थेट गावात जाऊन सखोल चौकशी केली असता अक्षयनेच हे कृत्य केल्याचे उघड झाले. यानंतर सेलू पोलिसांत तातडीने तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी तत्परतेने पावले उचलत अमरवाडा येथे जाऊन मृतदेहाची ओळख पटवली आणि आरोपीला गजाआड केले.

