
Updated by ✍️ स्टार वन न्युज मराठी ™
अकोले – 4 नोव्हेंबर 2025
अहिल्यानगर –अकोले : राजू
राजूर ✍️आदिवासी विकास विभागाच्या अखत्यारीतील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, राजूर (ता. अकोले, जि. अहिल्यानगर) येथील विविध शासकीय आश्रमशाळा आणि वसतिगृहांमध्ये होत असलेल्या कामकाजातील काही गैरप्रकारांविषयी छावा ब्रिगेडच्या वतीने आदिवासी मंत्री तसेच मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले.

या निवेदनात अन्नधान्य पुरवठा, अग्निशमन उपकरणांची देखभाल व इतर प्रशासकीय कामकाजात अनियमितता असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. तसेच काही अधिकाऱ्यांकडून काही सामाजिक कार्यकर्त्यांवर खोटे आरोप करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न झाल्याचेही नमूद करण्यात आले आहे.

या संदर्भात छावा ब्रिगेडच्या प्रतिनिधींनी मुख्यमंत्री तसेच आदिवासी मंत्री यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली होती. तथापि, अद्याप दोषी अधिकारी, शिक्षक, ठेकेदार किंवा पुरवठादार यांच्याविरुद्ध कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही, असा दावा छावा ब्रिगेडने निवेदनात केला आहे. छावा ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष विश्वनाथ वाघ, प्रदेश महासचिव राहुल रेळे, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष जादू शिंदे, एजाज शेख, मनोज भोसले आणि मुंबई अध्यक्ष जावेद शेख यांनी संयुक्तरित्या हे निवेदन सादर केले. त्यांनी तातडीने तपास करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कार्यवाही करावी, अन्यथा संघटनेतर्फे तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा दिला आहे.






