Kalyan ST Bus: कल्याण स्थानक परिसरातील कामामुळे आगाराचे स्थलांतर, सहा महिन्यांपासून एसटी प्रवाशांचे हाल सुरू
प्रतिनिधी ✍️ दुर्गेश गायकवाड

शुक्रवार दि. १९ जून, २०२६
Kalyan Flyover Work: कल्याण रेल्वे सथानक परिसारत बाहेरगावाहून येणाऱ्या प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. गेल्या सहा महिन्यांपासून मुख्य एसटी आगाराचं स्थलांतर केलं आहे.
कल्याण रेल्वे स्थानक परिसरात ‘स्मार्ट सिटी’ अंतर्गत उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने आधीच स्टेशन परिसराला वाहतूककोंडीचे ग्रहण लागले आहे. त्यातच येथील मुख्य एसटी आगार तात्पुरत्या स्वरूपात विठ्ठलवाडी आगारात स्थलांतरित करण्यात आले आहे.
बाहेरगावाहून येणाऱ्या एसटी बसगाड्या कल्याण पूर्वेकडून थेट विठ्ठलवाडीला जात असल्याने, कल्याण पश्चिमेकडे जाणाऱ्या प्रवाशांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे.
बस कल्याण आगारात जाणार नसल्याचे सांगून प्रवाशांना पत्रीपुलावर किंवा सूचक नाक्यावरच उतरवले जात आहे. या प्रवाशांना रिक्षासाठी तब्बल १०० ते १५० रुपये मोजून आधी कल्याण स्टेशन आणि त्यानंतर तिथून आपल्या अपेक्षित स्थळी जावे लागते.
मागील सहा महिन्यांहून अधिक काळ सुरू असलेला हा ‘द्राविडी प्राणायाम’ कधीतरी संपावा आणि एसटी प्रवाशांना किमान कल्याण रेल्वे स्टेशनच्या परिसरापर्यंत बस सेवा उपलब्ध व्हावी, अशी मागणी त्रासलेल्या प्रवाशांकडून होत आहे.
वर्षभरात एसटी प्रवाशांना कल्याण आगारातून प्रवास करता येईल,’ असे आश्वासन स्मार्ट सिटी आणि पालिका प्रशासनाकडून देण्यात आले होते.
मात्र, इमारतीचे काम अजूनही पायापर्यंतच रखडलेले आहे. तर पडघा, भिवंडीकडे जाणाऱ्या बसेससाठी रेल्वे स्थानक परिसरात तात्पुरती जागा दिली असली, तरी अनेक गैरसोयी आहेत..
अहिल्यानगर, बीड, उस्मानाबाद आणि कोकणातून येणाऱ्या गाड्यांना कल्याण डेपोत प्रवेश बंद आहे. या गाड्या गोविंदवाडी किंवा पत्रीपूल मार्गे कल्याण पूर्वेतून विठ्ठलवाडी आगारात जातात. त्यामुळे पत्रीपूल, नेतिवली नाका किंवा सूचक नाका परिसरात कल्याण पश्चिमेकडील प्रवाशांना उतरवले जाते.
बाहेरगावाहून येणाऱ्या प्रवाशांकडे सामानाचे मोठे ओझे असते. अशा वेळी अर्ध्या रस्त्यात उतरलेल्या प्रवाशांची असहाय्यता पाहून रिक्षाचालक अव्वाच्या सव्वा भाडे वसूल करत त्यांची लूट करतात.
अलिबागहून येणारी बस सूचक नाक्यावर किंवा डोंबिवली मार्गे आली तर पत्रीपुलावर प्रवाशांना उतरवते. तिथून कल्याण पश्चिमेकडे जाण्यासाठी रिक्षाचालक थेट १०० रुपयांची मागणी करतात.
अर्ध्या रस्त्यात उन्हातान्हात होणाऱ्या हालाचा प्रशासनाने गांभीर्याने विचार करावा.” भूषण जोशी, प्रवासी