सेनापती बापट पतसंस्था प्रकरणी विजय औटी यांच्या कार्यकाळाची चौकशी करा शिवराय सामाजिक प्रतिष्ठानची मागणी; ठेवीदार लवकरच मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांची भेट घेणार
सेनापती बापट पतसंस्था प्रकरणी विजय औटी यांच्या कार्यकाळाची चौकशी करा शिवराय सामाजिक प्रतिष्ठानची मागणी; ठेवीदार लवकरच मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांची भेट घेणार

सेनापती बापट पतसंस्था प्रकरणी विजय औटी यांच्या कार्यकाळाची चौकशी करा
शिवराय सामाजिक प्रतिष्ठानची मागणी; ठेवीदार लवकरच मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांची भेट घेणार
पारनेर / प्रतिनिधी : दिनांक 12 मार्च पत्रकार (योगेश खाडे)
पारनेर येथील सेनापती बापट नागरी सहकारी पतसंस्थेतील आर्थिक अनियमितता आणि ठेवीदारांच्या अडकलेल्या ठेवींच्या पार्श्वभूमीवर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व माजी आमदार विजय औटी यांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळातील कर्जवाटप व प्रशासनाची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी शिवराय सामाजिक प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष विनोद गोळे यांनी केली आहे.
पारनेर विधानसभा मतदारसंघाचे सलग पंधरा वर्षे प्रतिनिधित्व केलेले माजी आमदार विजय औटी यांनी सेनापती बापट नागरी सहकारी पतसंस्थेची स्थापना केली होती. मात्र सध्या या पतसंस्थेतील अनेक ठेवीदारांच्या ठेवी मोठ्या प्रमाणावर अडकून पडल्या असून सर्वसामान्य ठेवीदार आर्थिक अडचणीत सापडले आहेत. भाजीपाला विक्रेते, छोटे दुकानदार, लहान व्यावसायिक अशा सर्वसामान्य नागरिकांनी आयुष्यभराची बचत या पतसंस्थेत ठेवली होती.
दरम्यान, संस्थापक अध्यक्ष असलेल्या विजय औटी यांनी या प्रकरणाशी आपला संबंध नसल्याचे सांगत ठेवीदारांसमोर हात झटकले असल्याची नाराजी ठेवीदारांकडून व्यक्त होत आहे. त्यामुळे त्यांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात झालेले कर्जवाटप, आर्थिक व्यवहार तसेच प्रशासनिक निर्णय यांची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
शिवराय सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष विनोद गोळे यांनी सांगितले की, विजय औटी यांच्या कार्यकाळात पुणे परिसरातील टपरीधारक तसेच काही जवळच्या व्यक्तींना मोठ्या प्रमाणावर कर्जवाटप करण्यात आल्याची चर्चा आहे. त्यामुळे त्या काळातील कर्ज व्यवहार आणि आर्थिक कारभाराची चौकशी केल्यास अनेक बाबी स्पष्ट होतील.
भोसले – झंजाड यांच्या कारभाराचीही चौकशी करा
सेनापती बापट पतसंस्थेचे विद्यमान अध्यक्ष रामदास भोसले तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी रामदास झंजाड यांच्या कार्यकाळातही मोठ्या प्रमाणावर अनियमित व संशयास्पद कर्जवाटप झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या दोघांच्या कार्यकाळातील बोगस कर्जदार उघड करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही शिवराय सामाजिक प्रतिष्ठानतर्फे करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांची भेट घेणार
सेनापती बापट पतसंस्थेतील ठेवीदारांच्या अडकलेल्या ठेवी परत मिळाव्यात, कर्जदारांकडून वसुली करून ठेवीदारांना न्याय मिळावा, संस्थेची कार्यालये तातडीने सुरू करावीत तसेच दोषी अध्यक्ष, संचालक व अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, या मागण्यांसाठी ठेवीदार लवकरच मुख्यमंत्री Devendra Fadnavis आणि पालकमंत्री Radhakrishna Vikhe Patil यांची भेट घेणार असल्याची माहिती शिवराय सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष विनोद गोळे यांनी दिली.
या प्रकरणी शासनाने तातडीने लक्ष घालून ठेवीदारांना न्याय द्यावा, अन्यथा ठेवीदारांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.




