
Updated by ✍️ स्टार वन न्युज मराठी वृत्तसेवा ✍️
10 डिसेंबर 2025
मुंबई ✍️
महसूल विभागातील कामकाज अधिक पारदर्शक, जबाबदार आणि जनताकेंद्रित करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
मुंबई: जमीन व्यवहार, नाेंदणी, मुद्रांकशुल्क आदी महसुली कामकाजासाठी सर्वसामान्यांना संबंधित कार्यालयांत जावे लागते. मात्र या कार्यालयांतील काही आडमुठ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून त्यांना योग्य वागणूक मिळत नाही. याविरोधात बऱ्याचदा तक्रारी केल्यानंतरही या कर्मचाऱ्यांकडून दाद दिली जात नाही. याची गंभीर दखल महसूल विभागाकडून घेण्यात आली असून या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या तक्रारींची चौकशी केली जाणार आहे. यासाठी विभागीय आयुक्तांच्या स्तरावर दक्षता पथकाची स्थापना करण्यात आली आहे.
गौण खनिज, जमीन, मुद्रांक, जमीन मोजणी आणि संबंधित महसुली कामकाजाशी संबंधित प्राप्त होणाऱ्या तक्रारींची चौकशी करण्यासाठी विभागीय आयुक्तांच्या स्तरावर महसूल विभागाचे हे दक्षता पथक असेल. हे पथक आलेल्या प्रत्येक तक्रारीची ३० दिवसांच्या आत आणि अत्यंत गंभीर तक्रारींची १५ दिवसांच्या आत प्राथमिक चौकशी करून अहवाल सक्षम प्राधिकाऱ्यास सादर करेल.
दक्षता पथकाने कोणत्याही ठिकाणी कोणतीही तपासणी करताना पथकातील किमान चार अधिकारी उपस्थित असावेत. पथकातील कोणत्याही एका अधिकाऱ्यास स्वतंत्रपणे चौकशी करता येणार नाही, असे यासंदर्भात जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे. महसूल विभागातील कामकाज अधिक पारदर्शक, जबाबदार आणि जनताकेंद्रित करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले




