भुसावळ

आनंदवार्ता… भुसावळ–दादर खान्देश एक्स्प्रेस आता आठवड्याचे सहा दिवस; आणखी दोन थांबे मंजूर

प्रतिनिधी ✍️ दुर्गेश गायकवाड

शुक्रवार, दि. २६ जून, २०२६

जळगाव : उत्तर महाराष्ट्रातील प्रवाशांसाठी अत्यंत दिलासादायक निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला असून, भुसावळ–दादर खान्देश एक्स्प्रेस (१९००३/१९००४) ही गाडी १ ऑगस्टपासून शुक्रवार वगळता आठवड्यातील उर्वरित सर्व दिवस नियमित स्वरुपात धावणार आहे.

विशेष गाडीचा दर्जा संपुष्टात आल्यामुळे प्रवाशांना आकारले जाणारे २५ ते ३० टक्के अतिरिक्त विशेष प्रवास भाडे आता भरावे लागणार नाही. याशिवाय या गाडीला बोईसर आणि डहाणू रोड येथे अतिरिक्त थांबा मंजूर झाला आहे.

भुसावळ–दादर खान्देश एक्स्प्रेसला नियमित दर्जा देण्याच्या निर्णयासाठी खासदार स्मिता उदय वाघ यांनी रेल्वे मंत्रालयाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता.

धरणगाव तालुका प्रवासी मंडळानेही वेळोवेळी प्रवाशांच्या अडचणी रेल्वे प्रशासनाच्या निदर्शनास आणून देत नियमित गाडीची मागणी लावून धरली होती.

दोघांच्या संयुक्त प्रयत्नांना अखेर यश मिळाल्याने उत्तर महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

जनहिताचा हा निर्णय घेतल्याबद्दल रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव तसेच खासदार स्मिता वाघ यांचे आभार धरणगाव तालुका प्रवासी मंडळाकडून व्यक्त करण्यात आले आहेत.

उत्तर महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा दुवा

भुसावळ–दादर मार्ग हा उत्तर महाराष्ट्राला मुंबईशी जोडणारा अत्यंत महत्त्वाचा रेल्वे दुवा मानला जातो. भुसावळ, जळगाव, धरणगाव, अमळनेर, शिंदखेडा, दोंडाईचा, नंदुरबार तसेच परिसरातील लाखो नागरिक रोजगार, व्यवसाय, शिक्षण, वैद्यकीय उपचार, उद्योगधंदे आणि विविध शासकीय कामांसाठी नियमितपणे या मार्गावरील रेल्वे सेवेचा वापर करतात.

त्यामुळे वर्षभर या मार्गावरील गाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी असते. विशेषतः दिवाळी, गणेशोत्सव, उन्हाळी सुट्ट्या, ख्रिसमस, नववर्ष आणि इतर सणांच्या काळात आरक्षणासाठी प्रचंड स्पर्धा निर्माण होत असल्याने अनेक प्रवाशांना प्रतीक्षा यादीत राहावे लागत होते.

हेही वाचा

पावसाळी अधिवेशनात निधीचा पाऊस… नेरी–जामनेर राज्यमार्गाच्या काँक्रिटीकरणासाठी ‘इतके’ कोटी मंजूर!

प्रवासी क्षमतेत झाली वाढ

प्रवाशांची सातत्याने वाढणारी संख्या आणि वाढती मागणी लक्षात घेऊन अखेर रेल्वे प्रशासनाने भुसावळ–दादर मार्गावरील एक्सप्रेस गाड्यांच्या संरचनेतही अलीकडेच महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. सुधारित रचनेमुळे वातानुकूलित, शयनयान आणि सामान्य श्रेणीतील डब्यांची क्षमता वाढविण्यात आली असून अधिक प्रवाशांना आरक्षण उपलब्ध होऊ लागले आहे. यामुळे प्रतीक्षा यादीतील प्रवाशांची संख्याही कमी होण्यास मदत झाली असून रेल्वे प्रवास अधिक सुलभ होण्याची अपेक्षा आहे.

प्रवाशांना मोठा आर्थिक दिलासा

खान्देश एक्स्प्रेसला नियमित गाडीचा दर्जा मिळाल्याने सर्वसामान्य प्रवाशांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. विशेष गाडीसाठी आकारण्यात येणारे अतिरिक्त शुल्क रद्द झाल्याने प्रवासाचा खर्च कमी होईल.

तसेच बोईसर आणि डहाणू रोड येथे नवीन थांबे मिळाल्यामुळे पालघर जिल्ह्यातील प्रवाशांनाही या सेवेचा थेट लाभ मिळणार आहे. त्यामुळे खान्देश आणि मुंबईदरम्यानचा रेल्वे प्रवास अधिक सोयीस्कर, परवडणारा आणि प्रवाशाभिमुख होणार असल्याचे मत प्रवासी संघटनांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

रेल्वे मंत्रालयाच्या या निर्णयामुळे उत्तर महाराष्ट्रातील लाखो प्रवाशांच्या दीर्घकालीन मागणीला न्याय मिळाला असून भविष्यातही या मार्गावरील रेल्वे सेवांमध्ये आणखी सुधारणा होतील, अशी अपेक्षा प्रवाशांनी व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!