श्रीराम जन्मोत्सव निमित्त निघोजमध्ये पारंपरिक ढोल-लेझीम स्पर्धेचा जल्लोष
श्रीराम जन्मोत्सव निमित्त निघोजमध्ये पारंपरिक ढोल-लेझीम स्पर्धेचा जल्लोष

श्रीराम जन्मोत्सव निमित्त निघोजमध्ये पारंपरिक ढोल-लेझीम स्पर्धेचा जल्लोष
निघोज – दिनांक 27 मार्च
श्रीराम जन्मोत्सवानिमित्त निघोज येथे रविवार दि. २९ रोजी भव्य पारंपरिक ढोल-लेझीम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. सायंकाळी ७ ते रात्री १२ वाजेपर्यंत रंगणाऱ्या या स्पर्धेसाठी तब्बल पाऊण लाख रुपयांची आकर्षक बक्षीसे ठेवण्यात आली असल्याची माहिती आयोजक सकल हिंदू समाज निघोज व श्रीराम जन्मोत्सव समिती निघोज यांनी दिली.
याच दिवशी सायंकाळी ५ ते ७ या वेळेत प्रभू श्रीरामांची भव्य मिरवणूक काढण्यात येणार असून, मिरवणुकीत छत्रपती संभाजी महाराज यांचा जिवंत देखावा सादर केला जाणार आहे. पारंपरिक व ऐतिहासिक देखाव्यामुळे या सोहळ्याची रंगत आणखी वाढणार आहे.
स्पर्धेतील प्रथम क्रमांकासाठी रुपये २१ हजारांचे बक्षीस मच्छिंद्रशेठ लंके यांच्या वतीने देण्यात येणार आहे. द्वितीय क्रमांकासाठी १५ हजार रुपये जनसेवा फाउंडेशनचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील वराळ यांच्या कडून, तृतीय क्रमांकासाठी ११ हजार रुपये पंकज कारखिले यांच्या वतीने देण्यात येणार आहेत. तसेच चतुर्थ क्रमांकासाठी ७ हजार रुपये अमृताशेठ रसाळ यांच्या वतीने, तर पाचव्या क्रमांकासाठी ५ हजार रुपये बबुशा वरखडे यांच्या वतीने देण्यात येणार असून, याशिवाय अनेक उत्तेजनार्थ बक्षीसेही ठेवण्यात आली आहेत.
स्पर्धेच्या नियमांनुसार, प्रत्येक मंडळाने स्पर्धेच्या दिवशी सायंकाळी ५ वाजेपर्यंत नोंदणी करणे आवश्यक आहे. प्रत्येक संघात किमान ११ खेळाडू असणे बंधनकारक राहणार आहे. पिढीजात व पारंपरिक डावांना प्राधान्य दिले जाणार असून, प्रत्येक मंडळाला आपला खेळ सादर करण्यासाठी २० मिनिटांचा वेळ दिला जाईल. एकाच क्रमांकावर दोन संघ आल्यास बक्षीस विभागून देण्यात येईल. तसेच खेळांमध्ये कोणत्याही प्राण्याचा समावेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. पंचांचा निर्णय अंतिम राहणार आहे.
या स्पर्धेसाठी राष्ट्रपती पुरस्कार विजेते बाळासाहेब घोडे गुरुजी पंच म्हणून काम पाहणार असून, स्पर्धकांसाठी भोजनाची व्यवस्था मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टच्या वतीने करण्यात आली आहे.
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी व अधिक माहितीसाठी भिमराव लामखडे (मो. ९९७०९९५१५१) व गणेश वराळ (मो. ९९६०००१९३०) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
या भव्य स्पर्धेत परिसरातील ढोल-लेझीम पथकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असेही आवाहन सकल हिंदू समाज निघोज व श्रीराम जन्मोत्सव समिती निघोज यांच्या वतीने करण्यात आले आहे.




