
Updated by –स्टार वन न्युज मराठी ™
दिनांक १८ डिसेंबर | (पत्रकार : योगेश खाडे)

ठाणे
अंबरनाथ नगरपरिषद निवडणुकीसाठी २० डिसेंबर रोजी मतदान होत असून, शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या पार्श्वभूमीवर वार्ड क्रमांक १४ मधील लढत सध्या सर्वाधिक चर्चेत असून, अपक्ष उमेदवार सौ. हेमलता राजेंद्र कोठाळे यांची घोडदौड आघाडीवर असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. दिवसेंदिवस वाढणारे जनसमर्थन पाहता इतर उमेदवारांची चिंता वाढताना दिसत आहे.
पक्षीय राजकारणाला फाटा देत थेट जनतेच्या प्रश्नांवर उभी राहणारी उमेदवार म्हणून सौ. कोठाळे यांची ओळख आहे. पाणीपुरवठा, अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था, स्वच्छतेचा प्रश्न, महिला व ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न यावर त्यांनी सातत्याने आवाज उठवला आहे. त्यामुळे “फक्त आश्वासन नव्हे, प्रत्यक्ष काम” हीच त्यांची ओळख मतदारांमध्ये ठसठशीतपणे रुजली आहे.
प्रचारादरम्यान कोणताही गाजावाजा न करता त्यांनी साधेपणा राखत घराघरांत जाऊन थेट संवाद साधला. प्रत्येक गल्लीतील समस्या ऐकून घेणे, त्यावर ठोस उपाययोजना मांडणे आणि निवडून आल्यानंतरही जनतेशी संपर्क तुटू देणार नाही, हा दिलेला शब्द मतदारांना भावत आहे. याचाच परिणाम म्हणून वार्डात “आपलीच उमेदवार” अशी भावना बळावत आहे.

या निवडणूक लढतीला आणखी बळ मिळाले आहे ते म्हणजे त्यांचे पती राजेंद्र कोठाळे यांची समाजकारणातील भूमिका. वकील असलेले राजेंद्र कोठाळे समाजकारणात कायम अग्रेसर असून, सर्वसामान्य नागरिकांच्या न्यायासाठी त्यांनी अनेक वेळा पुढाकार घेतला आहे. कायदेशीर सल्ला, सामाजिक प्रश्नांवरील लढा आणि गरजू नागरिकांना मदतीचा हात देण्यामुळे कोठावळे कुटुंबावर नागरिकांचा विश्वास दृढ झाला आहे.
विशेषतः महिला मतदार, युवक वर्ग आणि सामान्य नागरिकांचा वाढता कल सौ. कोठाळे यांच्याकडे झुकताना दिसत आहे. पक्षीय उमेदवारांतील अंतर्गत नाराजी, आरोप-प्रत्यारोप आणि गोंधळ याच्या तुलनेत कोठाळे यांचा शांत, संयमी पण ठाम प्रचार वार्डात प्रभावी ठरत आहे.
राजकीय जाणकारांच्या मते, सध्याच्या परिस्थितीत वार्ड क्रमांक १४ मध्ये अपक्ष उमेदवारालाच संधी देण्याचा सूर स्पष्टपणे उमटत आहे. त्यामुळेच कोठावळे यांच्या विजयाबाबत चर्चा जोर धरू लागली आहे.
आता २० डिसेंबरच्या मतदानातून मतदार कोणाच्या पारड्यात कौल टाकतात हे स्पष्ट होणार असले तरी, सध्याच्या राजकीय समीकरणांनुसार अपक्ष उमेदवार सौ. हेमलता राजेंद्र कोठाळे यांचे पारडे निश्चितच जड असल्याचे चित्र ठळकपणे समोर येत आहे.



