Updated by स्टार वन न्युज मराठी ✍️
5 एप्रिल 2026

ताहाराबाद : वारकरी संप्रदायातील महान संतकवी म्हणून ओळखले जाणारे संत कवी महिपती महाराज यांच्या पावन स्मृतीप्रित्यर्थ आयोजित करण्यात आलेला हीरक महोत्सवी 60 वा फिरता नारळी सप्ताह यंदा दिनांक 7 एप्रिल ते 14 एप्रिल या कालावधीत बेलकरवाडी, श्री क्षेत्र ताहाराबाद, ता.राहुरी येथे अत्यंत भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न होणार आहे. वारकरी परंपरेतील हा सप्ताह अनेक वर्षांपासून भक्तिभावाने साजरा केला जात असून, यंदा सप्ताहाचे साठावे वर्ष (हीरक महोत्सव) असल्यामुळे सप्ताहाचे आयोजन विशेष भव्य आणि दिव्य स्वरूपात करण्यात आले आहे.
हा सप्ताह श्री महिपती महाराज देवस्थानाचे महंत पूज्य अर्जुनजी महाराज तनपुरे यांच्या अधिपत्याखाली आयोजित करण्यात आला असून, ह.भ.प. बाळकृष्ण महाराज शास्त्री, ह.भ.प. नाना महाराज गागरे आणि ह.भ.प. बाबासाहेब महाराज वाळुंज यांच्या मार्गदर्शनाखाली सप्ताहाचे नियोजन करण्यात आले आहे. या सप्ताहासाठी श्री क्षेत्र बेलकरवाडी ग्रामस्थांनी तसेच वारकरी संप्रदायातील भाविकांनी मोठ्या उत्साहाने आणि भक्तिभावाने व्यापक नियोजन केले आहे.
सप्ताहाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील नामवंत आणि प्रख्यात कीर्तनकारांची मांदियाळी भाविकांना अनुभवण्याची संधी मिळणार आहे. या कीर्तनकारांच्या सुश्राव्य वाणीतून संत साहित्य, भक्ती, समाजप्रबोधन आणि आध्यात्मिक विचारांचा संदेश भाविकांपर्यंत पोहोचणार आहे.
या सप्ताहात प्रमुख कीर्तनकार म्हणून ह.भ.प. चैतन्य महाराज निंबोळे (नाशिककर), ह.भ.प. केशव महाराज रामदास (पंढरपूर), ह.भ.प. आदिनाथ महाराज शास्त्री (तारकेश्वर गड), ह.भ.प. चंद्रशेखर महाराज देगलूरकर (पंढरपूर), ह.भ.प. बापूसाहेब महाराज देहुकर (पंढरपूर), ह.भ.प. पुंडलिक महाराज जंगले शास्त्री (अहिल्यानगर), ह.भ.प. डॉ. जयवंत महाराज बोधले (पंढरपूर), ह.भ.प. प्रेमानंद महाराज शास्त्री (श्री क्षेत्र सिद्ध पंढरी) तसेच ह.भ.प. महंत अर्जुनजी महाराज तनपुरे (श्रीक्षेत्र ताहाराबाद) यांची कीर्तन सेवा आयोजित करण्यात आली आहे.

या सर्व कीर्तनकारांच्या अमृतमय वाणीतून दररोज सायंकाळी 7 ते 9 या वेळेत कीर्तन सेवा पार पडणार आहे. या सप्ताहामध्ये संत साहित्याचा प्रचार, वारकरी संप्रदायाची परंपरा आणि समाजप्रबोधनाचा संदेश भाविकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
सप्ताहाचा समारोप ह.भ.प. बाळकृष्ण महाराज कांबळे यांच्या पारंपरिक आणि प्रभावी काल्याच्या कीर्तनाने होणार असून, या समारोप सोहळ्याला मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
या सप्ताहाच्या निमित्ताने परिसरातील तसेच राज्यातील अनेक वारकरी, संतप्रेमी आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असून संपूर्ण परिसर भक्तीमय वातावरणाने भारून जाणार आहे.
या भक्तिमय सप्ताहाचा लाभ घ्यावा आणि मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन वारकरी संप्रदाय तसेच श्री क्षेत्र बेलकरवाडी ग्रामस्थांच्या वतीने सर्व भाविकांना करण्यात आले आहे.
संपादक ✍️ सचिन रेवगडे 📱+919623968873



