अहिल्यानगर ✍️ अहमदनगरनिघोजमहाराष्ट्र

आमदार काशिनाथ दाते यांच्या हस्तक्षेपाने कुंड रस्त्याला ‘जीवदान’; यात्रेपूर्वी डागडुजीला वेग,यात्रा कमिटी व मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचा पुढाकार

निघोज -आमदार काशिनाथ दाते यांच्या हस्तक्षेपाने कुंड रस्त्याला ‘जीवदान’; यात्रेपूर्वी डागडुजीला वेग,यात्रा कमिटी व मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचा पुढाकार

निघोज दिनांक 6 एप्रिल
मळगंगा देवीच्या यात्रेच्या पार्श्वभूमीवर निघोज ते कुंड या मार्गावरील अत्यंत खराब झालेल्या रस्त्याच्या डागडुजीच्या कामास अखेर गती मिळाली असून आमदार काशिनाथ दाते यांच्या तातडीच्या हस्तक्षेपामुळे हे काम युद्धपातळीवर सुरू झाले आहे. मळगंगा देवी यात्रा समिती, मुंबईतील व्यावसायिक शंकरशेठ रामचंद्र वराळ पाटील, निघोज ग्रामस्थ, मुंबईकर मंडळ तसेच मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्ट, निघोज यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले आहे. येत्या गुरुवारपर्यंत हे काम पूर्ण होणार असल्याची माहिती संबंधित पदाधिकाऱ्यांनी दिली.
मळगंगा देवी यात्रा उत्सवाला दि. १ एप्रिलपासून प्रारंभ झाला असून मुख्य यात्रा शुक्रवार दि. १० पासून सुरू होत आहे. जगप्रसिद्ध रांजणखळगे परिसरातील कुंड यात्रा रविवार दि. १२ रोजी होत असल्याने लाखो भाविकांची उपस्थिती अपेक्षित आहे. मात्र निघोज ते कुंड हा सुमारे चार किलोमीटरचा रस्ता खड्ड्यांनी पूर्णपणे विदीर्ण झाल्याने यात्रेकरूंना मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत होत्या. त्यामुळे तात्पुरती डागडुजी करावी, अशी मागणी विविध स्तरांतून जोर धरत होती.
ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने आमदार काशिनाथ दाते यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी तात्काळ जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांना स्पष्ट सूचना दिल्या. त्यांच्या निर्देशानुसार संबंधित विभागाने विलंब न लावता काम हाती घेतले असून सध्या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम वेगाने सुरू आहे. यामुळे यात्रेपूर्वीच भाविकांना दिलासा मिळणार आहे.
कुंड यात्रेसाठी पुणे, अहिल्यानगर, मुंबई तसेच राज्यातील विविध भागांतून लाखो भाविक निघोज मार्गे कुंड येथे दाखल होत असतात. निघोज येथील कुंड व शिरूर तालुक्यातील टाकळीहाजी येथे मळगंगा देवीची मंदिरे असल्याने दोन्ही ठिकाणी दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी असते. अशा परिस्थितीत खराब रस्त्यामुळे निर्माण होणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी सुरू केलेली ही डागडुजी अत्यंत महत्त्वाची ठरत आहे.
दरम्यान, या रस्त्याच्या कायमस्वरूपी विकासासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून चार किलोमीटर रस्त्याचा सुमारे १२ कोटी रुपयांचा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर करण्यात आला असून येत्या सहा महिन्यांत या कामास सुरुवात होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे भविष्यात या मार्गाचा कायापालट होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
या डागडुजीच्या कामाचा शुभारंभ मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्ट, निघोज यांच्या पुढाकारातून करण्यात आला. ट्रस्टचे अध्यक्ष वसंत कवाद, उपाध्यक्ष तथा मळगंगा कन्स्ट्रक्शन कंपनीचे अध्यक्ष अमृताशेठ रसाळ, सचिव शांताराम कळसकर, मळगंगा देवी यात्रा समितीचे अध्यक्ष शिवाजीराव लंके, विश्वस्त दिलीप ढवण, भास्करराव कवाद, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष ॲड. बाळासाहेब लामखडे, ट्रस्टचे संघटक मंगेश वराळ, विश्वस्त ॲड. ज्ञानेश्वर लामखडे, रमेशशेठ ढवळे, बबनराव ससाणे, रोहिदास लामखडे, विठ्ठलराव कवाद, रमेशशेठ वरखडे, भास्कर ढवण आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून समाधान व्यक्त केले.

योगेश खाडे

योगेश खाडे पाटील हे स्टार वन न्युज मराठी चे जुन्नर तालुक्यातील एक अनुभवी पत्रकार आहे ✨ जिथे अन्याय होत असेल तिथे त्यांना मदत करण्याचे काम योगेश खाडे करताना दिसतात

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!