अहिल्यानगर ✍️ अहमदनगरनिघोजमहाराष्ट्र
मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे आरोग्यवर्धक पाऊल; शेंगदाणा तेल मशीनचे उद्घाटन उत्साहात डॉ. नामदेवराव नरवडे यांचे प्रतिपादन
मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे आरोग्यवर्धक पाऊल; शेंगदाणा तेल मशीनचे उद्घाटन उत्साहात डॉ. नामदेवराव नरवडे यांचे प्रतिपादन

मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे आरोग्यवर्धक पाऊल; शेंगदाणा तेल मशीनचे उद्घाटन उत्साहात
डॉ. नामदेवराव नरवडे यांचे प्रतिपादन
निघोज-दिनांक 24 फेब्रुवारी
निघोज येथील मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्ट यांच्या माध्यमातून राबविण्यात येणारे उपक्रम समाजोपयोगी व आरोग्यवर्धक असल्याचे प्रतिपादन आरोग्य प्रबोधनकार डॉ. नामदेवराव नरवडे यांनी केले. ट्रस्ट संचालित मळगंगा प्रसादालयात शेंगदाणा तेल मशीनचे उद्घाटन त्यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. त्यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी ट्रस्टचे अध्यक्ष वसंत कवाद सर व उपाध्यक्ष अमृताशेठ रसाळ यांनी प्रास्ताविकातून ट्रस्टच्या विविध समाजाभिमुख उपक्रमांचा आढावा घेतला. ग्रामीण भागातील नागरिकांना शुद्ध व निरोगी अन्नपदार्थ उपलब्ध करून देण्यासाठी ट्रस्ट सातत्याने प्रयत्नशील असल्याचे त्यांनी नमूद केले.
डॉ. नरवडे आपल्या भाषणात म्हणाले, “सध्याच्या काळात भेसळयुक्त अन्नपदार्थांचे प्रमाण वाढले असून त्याचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. तेल, दूध व इतर खाद्यपदार्थांतील भेसळ ही गंभीर समस्या बनली आहे. त्यामुळे तरुण वयातच विविध आजारांचे प्रमाण वाढताना दिसते. आरोग्य हीच खरी संपत्ती असून त्यासाठी जागरूकता व शुद्ध आहार अत्यावश्यक आहे.”
ते पुढे म्हणाले, “आपल्या देशात आजारांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असताना जपानसारख्या देशात ९० वर्षांचा नागरिकही सक्षमपणे काम करतो आणि शतायुषी आयुष्य जगतो. यामागे त्यांच्या आहारातील शुद्धता व जीवनशैली कारणीभूत आहे. मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टने शेंगदाणा तेल मशीनच्या माध्यमातून भेसळीला आळा घालण्याचा घेतलेला पुढाकार हा कौतुकास्पद असून याचा थेट लाभ ग्रामस्थांना होणार आहे.”
निघोज व परिसरातील जनतेसाठी आरोग्यवर्धक उपक्रम राबविणारे हे अहिल्यानगर जिल्ह्यातील पहिलेच देवस्थान ठरत असल्याचा उल्लेखही त्यांनी केला. ट्रस्टचे पदाधिकारी, विश्वस्त मंडळ, सल्लागार व सभासद यांनी सातत्याने ट्रस्टचा नावलौकिक राज्यभर वाढविण्यासाठी केलेल्या कार्याचे त्यांनी विशेष कौतुक केले.
या कार्यक्रमास ट्रस्टचे सर्व पदाधिकारी, विश्वस्त मंडळ, सल्लागार मंडळ, विविध संस्थांचे पदाधिकारी, आजी-माजी सरपंच, उपसरपंच तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोमनाथ वरखडे यांनी केले, तर सचिव शांताराम कळसकर यांनी आभार मांडले.



