किल्ले शिवनेरी येथून आलेल्या शिवज्योतीचे आळकुटीत जल्लोषात स्वागत डॉ. भास्करराव शिरोळे यांच्या हस्ते पूजन; ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग
किल्ले शिवनेरी येथून आलेल्या शिवज्योतीचे आळकुटीत जल्लोषात स्वागत डॉ. भास्करराव शिरोळे यांच्या हस्ते पूजन; ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग

किल्ले शिवनेरी येथून आलेल्या शिवज्योतीचे आळकुटीत जल्लोषात स्वागत
डॉ. भास्करराव शिरोळे यांच्या हस्ते पूजन; ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग
निघोज-दिनांक 19 फेब्रुवारी पत्रकार (योगेश खाडे)
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त किल्ले शिवनेरी येथून अळकुटी सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीने आणलेली पवित्र शिवज्योत अळकुटी गावात मोठ्या उत्साहात आणि भक्तीभावाने स्वागत करण्यात आले. या ज्योतीचे स्वागत निघोज-अळकुटी जिल्हा परिषदेचे नेते तथा शिवसेना (ठाकरे गट) उपजिल्हाध्यक्ष डॉ. भास्करराव शिरोळे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
शिवज्योत गावात दाखल होताच ढोल-ताशांच्या गजरात आणि “जय भवानी, जय शिवाजी”च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. ग्रामस्थांनी पारंपरिक वेशभूषेत, भगवे झेंडे हातात घेऊन ज्योतीचे दर्शन घेतले. महिलांनी औक्षण करून आणि फुलांच्या वर्षावाने ज्योतीचे स्वागत केले.
डॉ. भास्करराव शिरोळे यांनी शिवज्योतीचे पूजन करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा आदर्श प्रत्येकाने आचरणात आणण्याचे आवाहन केले. त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “शिवज्योत ही केवळ एक ज्योत नसून ती स्वाभिमान, शौर्य आणि राष्ट्रप्रेमाची प्रेरणा आहे. तरुण पिढीने शिवरायांच्या विचारांवर चालत समाजकार्यात पुढे यावे.”
या स्वागत सोहळ्यात गावातील युवक, महिला मंडळे, शिवप्रेमी नागरिक आणि विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवज्योतीचे गावातील प्रमुख मार्गांवरून मिरवणूक काढण्यात आली. सर्वत्र भगव्या पताका, आकर्षक रोषणाई आणि फलकांमुळे वातावरण शिवमय झाले होते.
शिवज्योतीच्या आगमनामुळे आळकुटी परिसरात शिवजयंती उत्सवाला विशेष उत्साह प्राप्त झाला असून, आगामी कार्यक्रमांची रूपरेषा जाहीर करण्यात आली आहे.
आळकुटी ग्रामस्थांच्या या उत्स्फूर्त सहभागामुळे शिवभक्तीचा जागर अधिक बळकट झाल्याची भावना व्यक्त होत आहे.




