युपीएससी परीक्षेत निघोजच्या अल्पेश ढवळे यांचे यश; ६८७ वी रँक मिळवत आईच्या कष्टाचे केले चीज
युपीएससी परीक्षेत निघोजच्या अल्पेश ढवळे यांचे यश; ६८७ वी रँक मिळवत आईच्या कष्टाचे केले चीज

युपीएससी परीक्षेत निघोजच्या अल्पेश ढवळे यांचे यश; ६८७ वी रँक मिळवत आईच्या कष्टाचे केले चीज
निघोज – दिनांक 7 मार्च
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (युपीएससी) अत्यंत प्रतिष्ठेच्या परीक्षेत निघोज येथील अल्पेश अरुणा भाऊसाहेब ढवळे यांनी ६८७ वी रँक मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळवलेल्या या यशामुळे निघोज व परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून अल्पेश यांचे सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक होत आहे.
अल्पेश ढवळे यांनी प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत घेतले. त्यानंतर माध्यमिक शिक्षण स्थानिक विद्यालयात पूर्ण करून पुढील उच्च शिक्षणासाठी त्यांनी शिरूर व पुणे येथे शिक्षण घेतले. लहानपणापासूनच अभ्यासू व जिद्दी स्वभाव असलेल्या अल्पेश यांनी दिल्ली येथे जाऊन युपीएससी परीक्षेची कठोर तयारी केली. सातत्यपूर्ण अभ्यास, मेहनत आणि कुटुंबीयांचे पाठबळ यांच्या जोरावर त्यांनी अखेर या स्पर्धात्मक परीक्षेत यश संपादन केले.
अल्पेश यांच्या आयुष्यातील संघर्षमय प्रवासही तितकाच प्रेरणादायी आहे. बालपणीच वडिलांचे निधन झाल्याने संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी आई अरुणा ढवळे यांच्या खांद्यावर आली. शेती करून आणि कष्टाची पराकाष्ठा करत त्यांनी मुलांचे संगोपन केले. आईच्या त्याग, मेहनत व संस्कारांमुळेच अल्पेश यांनी हे मोठे यश संपादन केले असल्याची भावना ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.
अल्पेश यांचे मोठे बंधू अक्षय ढवळे हे पुणे येथील नामांकित कंपनीत कार्यरत असून त्यांनीही अल्पेश यांच्या उच्च शिक्षणासाठी मोलाचे योगदान दिले. याशिवाय आई, चुलते, आजी-आजोबा तसेच मामा यांच्यासह संपूर्ण कुटुंबाने त्यांच्या शिक्षणासाठी सातत्याने पाठबळ दिले. या सर्वांच्या सहकार्यामुळेच हे यश शक्य झाल्याची भावना अल्पेश यांनी व्यक्त केली आहे.
अल्पेश ढवळे यांच्या या यशामुळे निघोज गावासह संपूर्ण परिसराचा मान उंचावला आहे. विविध सामाजिक, राजकीय व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
चौकट : प्रेरणादायी यशाची नोंद
अत्यंत खडतर परिस्थितीतून मार्ग काढत अल्पेश अरुणा भाऊसाहेब ढवळे यांनी युपीएससी परीक्षेत ६८७ वी रँक मिळवत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. विशेष म्हणजे निघोज व परिसरातील युपीएससी परीक्षेत उत्तीर्ण होणारे ते पहिलेच युवक ठरले असल्याची भावना ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे. त्यांच्या या यशामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आदर्श निर्माण झाला आहे.




