अहिल्यानगर ✍️ अहमदनगरनिघोजमहाराष्ट्र

शाहीर नारायणराव अटक यांचे पुण्यस्मरण भावपूर्ण वातावरणात संपन्न

शाहीर नारायणराव अटक यांचे पुण्यस्मरण भावपूर्ण वातावरणात संपन्न

  • शाहीर नारायणराव अटक यांचे पुण्यस्मरण भावपूर्ण वातावरणात संपन्न
    अहो पहा फुटलं धरण फुटलं,
    पानशेतनी पुण्याला लुटलं…
    पानशेत धरण फुटीच्या भीषण प्रसंगावर आधारित हे अजरामर गीत आजही रसिकांच्या मनात घर करून आहे. या गीताचे रचनाकार स्वर्गीय शाहीर नारायणराव रामचंद्र अटक (१ फेब्रुवारी १९३३ – २० मार्च २००६) यांच्या पुण्यस्मरणाचा कार्यक्रम २० मार्च २०२६ रोजी देवीभोयरे (ता. पारनेर, जि. अहिल्यानगर) येथे अत्यंत भावपूर्ण वातावरणात पार पडला. श्री नारायणराव युनिव्हर्सल फाऊंडेशनच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
    कार्यक्रमाची सुरुवात शाहीर दत्ता जाधव करंडीकर, अविनाश अटक, निलेश दुनगुले व पोपट दुनगुले यांच्या दमदार पोवाडे आणि गोंधळगीतांनी झाली. त्यांच्या सादरीकरणाने उपस्थित श्रोत्यांना शाहिरी परंपरेची जाणीव करून देत वातावरण भारावून टाकले.
    यानंतर मान्यवरांच्या आदरांजलीपर भाषणांचा कार्यक्रम झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावचे सरपंच अशोक मुळे होते. प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले तुकाराम धुमाळ (सेवानिवृत्त प्राचार्य, रयत शिक्षण संस्था, सातारा) यांनी शाहीर अटक यांच्या देवीभक्तीपर, धार्मिक तसेच सामाजिक आशयाच्या काव्यरचनांचा गौरव केला. “धरण फुटलं” या त्यांच्या गाजलेल्या गीताची आठवण करून देत त्यांनी शाहीरांच्या प्रभावी गायनकलेचे आणि तमाशा क्षेत्रातील त्यांच्या अभिनय कौशल्याचे विशेष कौतुक केले. राजा आणि खलनायकाच्या भूमिका ते अत्यंत प्रभावीपणे साकारत असत, असेही त्यांनी नमूद केले.
    यावेळी फाऊंडेशनतर्फे सुमारे १५० शिक्षकांचा ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात आला. यात सेवानिवृत्त, कार्यरत तसेच गावातील सर्वच शिक्षकांचा समावेश असल्याने हा सन्मान सोहळा विशेष ठरला. तसेच स्व. शाहीर नारायणराव अटक यांच्या धर्मपत्नी कमल अटक यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला.
    कार्यक्रमाच्या व्यासपीठावर हरिभाऊ चौधरी, सुभाष बेलोटे, सुजाता गाजरे (माजी सरपंच), विठ्ठल सरडे (मा. सरपंच), विकास सावंत (मा. उपसरपंच), नाना ढवळे (ज्येष्ठ साहित्यिक व पत्रकार), विश्वनाथ गाजरे, बाबुराव मुळे, सुदाम म्हस्के सर, रावसाहेब वाळुंज आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली.
    कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मंगेश मुळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन पांडुरंग बेलोटे यांनी मानले.
    या कार्यक्रमाला ग्रामस्थ महिला-पुरुषांसह विद्यार्थ्यांचीही मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. विशेषतः विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग लक्षवेधी ठरला.
    कार्यक्रमानंतर सर्व उपस्थितांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. या स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता आपुलकीच्या वातावरणात झाली.

योगेश खाडे

योगेश खाडे पाटील हे स्टार वन न्युज मराठी चे जुन्नर तालुक्यातील एक अनुभवी पत्रकार आहे ✨ जिथे अन्याय होत असेल तिथे त्यांना मदत करण्याचे काम योगेश खाडे करताना दिसतात

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!