
पारनेर – दिनांक 2 मार्च
कुकडी डावा कालव्याला तात्काळ पाणी सोडण्यात यावे, अन्यथा मंगळवार दि. ३ मार्च रोजी सकाळी ९ वाजता निघोज एस.टी. बस स्थानक परिसरात तीव्र रास्ता रोको आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा डॉ. भास्करराव शिरोळे व माजी सरपंच ठकारामशेठ लंके यांनी दिला आहे.

याबाबत पारनेर तहसीलदार तसेच संबंधित पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना शेकडो शेतकऱ्यांच्या सह्यांसह निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, कुकडी डावा कालव्याला दि. १ मार्चपर्यंत पाणी सोडणे अत्यावश्यक होते; मात्र सरकारकडून होत असलेल्या वेळकाढूपणामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होत आहे.
महायुती सरकार शेतकऱ्यांची आर्थिक नाकेबंदी करीत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. एकीकडे शेतीमालाला बाजारभाव नाही, तर दुसरीकडे पुणे जिल्ह्यातील धरणांमध्ये मुबलक पाणी उपलब्ध असूनही नियोजनाअभावी पाणी सोडण्यात आलेले नाही. यामुळे कांदा, कडवळ, घास व हिरवा चारा यांसारखी पिके जळून जाण्याच्या मार्गावर आहेत.
निवडणुकीत जाहीर केलेली कर्जमाफी अद्याप प्रत्यक्षात आलेली नसल्याने शेतकरी आधीच अडचणीत आहेत. खाजगी बँका व पतसंस्थांकडून कर्ज काढून शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. सरकारचे धोरण सर्वसामान्य शेतकऱ्यांना हतबल करण्याचेच असल्याचा संतप्त आरोप शेतकरी नेत्यांनी केला.
दि. २ मार्चच्या मध्यरात्रीपर्यंत अथवा उशिरात उशिरा दि. ३ मार्चपर्यंत कुकडी डावा कालव्याला पाणी सोडण्याचे स्पष्ट आश्वासन तहसीलदार व पाटबंधारे विभागाने द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा मंगळवार दि. ३ मार्च रोजी सकाळी ९ वाजता निघोज एस.टी. बस स्थानक परिसरात तीव्र रास्ता रोको आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. या आंदोलनाची सर्वस्वी जबाबदारी सरकारची राहील, असेही स्पष्ट करण्यात आले.
या शिष्टमंडळात बाजार समितीचे सभापती किसनराव रासकर, उपसभापती किसनराव सुपेकर, निघोज सोसायटीचे माजी चेअरमन बाळासाहेब लामखडे, बाजार समितीचे माजी संचालक अण्णा पाटील बढे, माजी सरपंच सुभाषराव खोसे, चोंभूतचे सरपंच दत्तात्रय म्हस्के, सामाजिक कार्यकर्ते मंगेश वराळ, ग्रामपंचायत सदस्य दिगंबर लाळगे, शंकरराव गुंड, मच्छिंद्र गोपाळे, संतोष खाडे, रामदास पारखे, बाळासाहेब वाघ, हौशाभाऊ शेटे, राजेंद्र दाते, अशोक परंडवाल, बाळासाहेब गोरडे, विठ्ठलराव मोरे, खंडू गोरडे, प्रविण चौधरी आदींसह शेकडो शेतकऱ्यांचा समावेश होता.
शेतकऱ्यांच्या या इशाऱ्यामुळे प्रशासनाची धावपळ उडाली असून, आता सरकार कोणती भूमिका घेते याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.




