रामनवमी केवळ सण नव्हे, तर आदर्श जीवनाची प्रेरणा — लक्ष्मण महाराज कदम शास्त्री निघोज येथे रामजन्म उत्सव भक्तिभावाने साजरा
रामनवमी केवळ सण नव्हे, तर आदर्श जीवनाची प्रेरणा — लक्ष्मण महाराज कदम शास्त्री निघोज येथे रामजन्म उत्सव भक्तिभावाने साजरा

रामनवमी केवळ सण नव्हे, तर आदर्श जीवनाची प्रेरणा — लक्ष्मण महाराज कदम शास्त्री
निघोज येथे रामजन्म उत्सव भक्तिभावाने साजरा
निघोज – दिनांक 26 मार्च
रामनवमी हा केवळ एक सण नसून सत्य, धर्म आणि आदर्श जीवन जगण्याची प्रेरणा देणारा पवित्र दिवस आहे, असे प्रतिपादन लक्ष्मण महाराज कदम शास्त्री यांनी केले. निघोज येथे प्रभू राम जन्मोत्सवानिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताहात त्यांनी रामनवमी निमित्त किर्तनातून मार्गदर्शन केले.
गुरुवार दि. २६ रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत आळंदी येथील लक्ष्मण महाराज कदम शास्त्री यांचे कीर्तन मोठ्या भक्तिभावात पार पडले. यावेळी भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. प्रभू रामचंद्रांच्या जन्मक्षणी फुलांचा वर्षाव करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारून गेला होता.
मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम हे केवळ देव नसून प्रत्येकाच्या आयुष्यातील आदर्श व्यक्तिमत्त्व आहेत. त्यांच्या जीवनातून कर्तव्यनिष्ठा, संयम, प्रामाणिकपणा आणि नात्यांप्रती असलेली बांधिलकी शिकायला मिळते. आजच्या धावपळीच्या जीवनातही रामांचे विचार योग्य मार्ग दाखवतात, असेही त्यांनी सांगितले.
रामनवमी हा सण आपल्या संस्कृतीची, परंपरेची आणि मूल्यांची जाणीव करून देणारा आहे. हा दिवस मन, विचार आणि आचरण शुद्ध करण्याची संधी असल्याचे त्यांनी नमूद केले. प्रभू रामांच्या कृपेने जीवनात शांतता, समाधान आणि यश लाभावे, अशी प्रार्थना व्यक्त करत प्रत्येकाने रामांचे गुण आत्मसात करण्याचा संकल्प करावा, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी माजी सरपंच चंद्रकांत लामखडे व मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे माजी अध्यक्ष प्रभाकर कवाद यांच्या हस्ते लक्ष्मण महाराज कदम शास्त्री यांचा सत्कार करण्यात आला. तसेच अखंड हरिनाम सप्ताहाचे चित्रीकरण करून ते सामाजिक माध्यमांद्वारे प्रसारित करणारे दत्तात्रय रामचंद्र लंके यांचाही सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोमनाथ महाराज वरखडे यांनी केले, तर मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे कोषाध्यक्ष रामदास शेठ वरखडे यांनी सहकार्य केले. रमेश महाराज लंके, निवृत्ती महाराज तनपुरे, महादेव महाराज कवाद यांनी आभार मानले.
चौकट : बालसंस्कारातून घडते आदर्श पिढी
आजच्या काळात अध्यात्मिक संस्कारांचे महत्त्व अधिक वाढले असून, या संस्कारांद्वारेच आदर्श पिढी घडू शकते, असे मत लक्ष्मण महाराज कदम शास्त्री यांनी व्यक्त केले. निघोज येथील नंदू महाराज वराळ गेली अनेक वर्षे बालसंस्कार शिबिरांच्या माध्यमातून मुलांमध्ये चांगले संस्कार रुजविण्याचे कार्य निस्वार्थ भावनेने करीत आहेत. त्यांच्या या कार्यामुळे निघोज गावाचे नाव उज्ज्वल होत असून, असा सुपुत्र या गावात जन्माला आला, हे निघोजकरांचे भाग्य असल्याचेही त्यांनी गौरवोद्गार काढले.




