अहिल्यानगर ✍️ अहमदनगरनिघोजमहाराष्ट्र

मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी न्यूनगंड झटकावा; आत्मविश्वासाने पुढे चला! ज्येष्ठ साहित्यिक नाना ढवळे यांचे प्रभावी मार्गदर्शन

मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी न्यूनगंड झटकावा; आत्मविश्वासाने पुढे चला! ज्येष्ठ साहित्यिक नाना ढवळे यांचे प्रभावी मार्गदर्शन

मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी न्यूनगंड झटकावा; आत्मविश्वासाने पुढे चला!
ज्येष्ठ साहित्यिक नाना ढवळे यांचे प्रभावी मार्गदर्शन
निघोज देवीभोयरे दिनांक 4 मार्च                                      इंग्रजी माध्यमाच्या शाळांचा झगमगाट पाहून मराठी माध्यमात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी स्वतःला कधीही कमी लेखू नये. मातृभाषेतून शिक्षण घेतल्याने विचारांची मुळे भक्कम होतात आणि व्यक्तिमत्त्व अधिक सक्षम बनते, असे ठाम प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक व पत्रकार नाना ढवळे यांनी केले.
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त २७ फेब्रुवारी रोजी देवीभोयरे (ता. पारनेर, जि. अहिल्यानगर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेत आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. विद्यार्थ्यांनी आपल्या मातृभाषेचा अभिमान बाळगून ज्ञानार्जनात सातत्य ठेवावे, असे आवाहन त्यांनी केले.
इतिहासातील दाखला देताना त्यांनी सांगितले की, इंग्रजांच्या काळात पुण्यात पेशव्यांच्या दरबारात रेसिडेंट म्हणून कार्यरत असलेले माऊंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन हे इंग्रजी शिक्षण घेतलेले असूनही त्यांना मराठी भाषेचे उत्तम ज्ञान होते. मग मराठी माध्यमातून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना इतर मार्गांनी इंग्रजीवर प्रभुत्व मिळविता येणार नाही का? असा परखड प्रश्न त्यांनी उपस्थित केला. भाषेचे माध्यम नव्हे, तर जिद्द, परिश्रम आणि आत्मविश्वास यशाचे खरे आधारस्तंभ असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक रावसाहेब वाळुंज होते. प्रास्ताविक व सूत्रसंचालन दादाभाऊ बेलोटे यांनी केले, तर समारोपही त्यांनीच केला. कार्यक्रमाच्या शेवटी संगिता मोरे यांच्या हस्ते नाना ढवळे यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी मंजाबा तिकोणे, बाळासाहेब दिघे, पुष्पा मोरे, सुनीता गाडेकर, सुलोचना बेलोटे, वर्षा मगर, अक्षदा मुळे आदी शिक्षकवृंद उपस्थित होते. विद्यार्थ्यांची उपस्थिती लक्षणीय होती. मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने झालेल्या या प्रेरणादायी कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये मातृभाषेबद्दल अभिमान आणि आत्मविश्वासाची नवी उर्मी संचारल्याचे चित्र दिसून आले.

योगेश खाडे

योगेश खाडे पाटील हे स्टार वन न्युज मराठी चे जुन्नर तालुक्यातील एक अनुभवी पत्रकार आहे ✨ जिथे अन्याय होत असेल तिथे त्यांना मदत करण्याचे काम योगेश खाडे करताना दिसतात

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!