मध्यरात्री पाणी सोडण्याचा प्रयत्न करू” — आश्वासनानंतर आंदोलन स्थगित कुकडी डावा कालव्याच्या प्रश्नावर प्रशासनाशी सकारात्मक चर्चा
मध्यरात्री पाणी सोडण्याचा प्रयत्न करू” — आश्वासनानंतर आंदोलन स्थगित कुकडी डावा कालव्याच्या प्रश्नावर प्रशासनाशी सकारात्मक चर्चा

“मध्यरात्री पाणी सोडण्याचा प्रयत्न करू” — आश्वासनानंतर आंदोलन स्थगित
कुकडी डावा कालव्याच्या प्रश्नावर प्रशासनाशी सकारात्मक चर्चा
निघोज / प्रतिनिधी | दिनांक ३ मार्च
कुकडी डावा कालव्याला मंगळवार दि. ३ रोजी मध्यरात्री पाणी सोडण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन पाटबंधारे विभागाकडून देण्यात आल्यानंतर निघोज येथे सुरू असलेले रास्ता रोको आंदोलन स्थगित करण्यात आले. शिवसेनेचे अहिल्यानगर उपजिल्हाप्रमुख डॉ. भास्करराव शिरोळे, माजी सरपंच ठकारामशेठ लंके तसेच बाजार समितीचे सभापती किसनराव रासकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले होते.
कुकडी डावा कालव्याला तात्काळ पाणी सोडावे, या मागणीसाठी निघोज एस.टी. बसस्थानक परिसरात सकाळी ९ ते ११ या वेळेत रास्ता रोको करण्यात आला. शिरूर–पारनेर मार्गावर वाहनांच्या रांगा लागून वाहतूक विस्कळीत झाली होती. परिस्थितीची दखल घेत पोलीस प्रशासन व पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने आंदोलनस्थळी धाव घेतली.
पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अधिकारी तान्हाजी खाडे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून मंगळवार दि. ३ रोजी मध्यरात्री दरम्यान पाणी सोडण्याचा प्रयत्न करू, असे स्पष्ट केले. या शब्दांत आश्वासन देण्यात आल्यानंतर सर्वानुमते आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला.
स्थानिक पदाधिकाऱ्यांची उपस्थिती
आंदोलनात ग्रामपंचायत सदस्य दिगंबर लाळगे, ग्रा. सदस्य शंकर गुंड, मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे सहसचिव विश्वास शेटे, तसेच जालिंदर लंके व शेतकरी विभागाचे तालुकाध्यक्ष महेंद्र पांढरकर यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. विविध सामाजिक संस्था, सहकारी सोसायट्यांचे पदाधिकारी आणि प्रगतशील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“हा लढा हक्कासाठीच” — डॉ. शिरोळे
आंदोलनकर्त्यांना मार्गदर्शन करताना डॉ. भास्करराव शिरोळे यांनी सांगितले की, “पाणी हा शेतकऱ्यांचा मूलभूत अधिकार आहे. प्रशासनाने दिलेले आश्वासन प्रत्यक्षात उतरले पाहिजे. अन्यथा पुढील भूमिका ठरवावी लागेल.”
माजी सरपंच ठकारामशेठ लंके व सभापती किसनराव रासकर यांनीही शेतकऱ्यांच्या भावनांना न्याय देण्याची जबाबदारी प्रशासनावर असल्याचे नमूद केले.
पोलीस उपनिरीक्षक खंडागळे यांच्या नेतृत्वाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
प्रशासनाने “प्रयत्न करू” असा शब्द दिल्याने शेतकऱ्यांनी आंदोलन स्थगित केले असले तरी प्रत्यक्षात पाणी सोडले जाते का, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.




