अहिल्यानगर ✍️ अहमदनगरनिघोजमहाराष्ट्र

अवकाळी गारपीटीचा निघोज परिसरावर कहर; शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान सरसकट पंचनामे करून तातडीने मदत द्या – संतप्त शेतकऱ्यांची मागणी

अवकाळी गारपीटीचा निघोज परिसरावर कहर; शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान सरसकट पंचनामे करून तातडीने मदत द्या – संतप्त शेतकऱ्यांची मागणी

अवकाळी गारपीटीचा निघोज परिसरावर कहर; शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान
सरसकट पंचनामे करून तातडीने मदत द्या – संतप्त शेतकऱ्यांची मागणी
निघोज – दि 20 मार्च पत्रकार (योगेश खाडे)
निघोज व परिसरावर गुरुवार दि. १९ रोजी दुपारच्या सुमारास अवकाळी गारपीटीचा अक्षरशः कहर कोसळला. वादळी वाऱ्यासह झालेल्या या मुसळधार पावसाने काढणीस आलेली पिके, फळबागा आणि शेतात ठेवलेला शेतीमाल उद्ध्वस्त केला असून शेकडो शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांवर या नैसर्गिक आपत्तीने घाव घातल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
दुपारनंतर अचानक वातावरणात बदल होऊन आकाश काळवंडले आणि काही क्षणातच वादळी वाऱ्यासह गारांचा मारा सुरू झाला. निघोजसह कुकडी डावा कालवा क्षेत्रातील गावांमध्ये गारांचा जोर इतका होता की उभ्या पिकांसह काढणीस आलेला गहू व कांदा अक्षरशः जमीनदोस्त झाला. अनेक शेतकऱ्यांनी काढलेला कांदा व गहू शेतातच ठेवला असल्याने हा माल पूर्णपणे भिजून खराब झाला आहे.
शिवडी, शिववाडी, मोरवाडी, रसाळवाडी, वडनेर, वडगाव गुंड या भागांमध्ये डाळिंब, आंबा व इतर फळबागांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गारपीटीच्या तडाख्याने झाडांवरील फळे गळून पडली असून झाडांचीही हानी झाली आहे. प्राथमिक अंदाजानुसार शेकडो शेतकरी बाधित झाले असून नुकसानाची रक्कम कोट्यवधींच्या घरात पोहोचली आहे.
दरम्यान, शेतीमालाला हमीभाव नसल्याने आधीच शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबला आहे. बँकांकडून कर्ज न मिळाल्याने पतसंस्थांकडून अव्वाच्या सव्वा व्याजदराने कर्ज घ्यावे लागत आहे. त्यातच वाढता उत्पादन खर्च, औषध फवारणी व खतांचा खर्च यामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे कोलमडला असताना या अवकाळी पावसाने त्याच्या हाती आलेले पीकही हिरावून घेतले आहे.
या पार्श्वभूमीवर संतप्त शेतकऱ्यांनी आमदार काशिनाथ दाते यांच्याकडे धाव घेत तातडीने सरसकट पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे. दाते यांनीही संबंधित अधिकाऱ्यांना पंचनाम्याच्या सूचना दिल्या असून हा प्रश्न राज्य पातळीवर मांडण्याची गरज व्यक्त केली आहे. त्यांनी नांदगाव शिंगवे परिसरात प्रत्यक्ष पाहणी करून नुकसानीचा आढावा घेतला आहे.
निघोज परिसरात पारनेर तालुक्यातील सर्वाधिक गारपीट झाल्याचे स्पष्ट होत असून शासनाने तातडीने मदत जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी आता जोर धरत आहे.
चौकट : कांदा पिकावर गारपीटीचा घाव; एकरी ५० हजारांचा तोटा
गारपीटीचा सर्वाधिक फटका कांदा पिकाला बसला आहे. काढणीस आलेला कांदा पूर्णपणे भिजल्याने तो चाळीत टाकल्यानंतर सडण्याची भीती निर्माण झाली आहे. आधीच बाजारभाव अत्यंत कमी असताना शेतकऱ्यांना तोट्यातच कांदा विकावा लागणार असल्याने एकरी सुमारे ५० हजार रुपयांपर्यंत नुकसान होणार आहे.
फळबागा व इतर पिकांचीही अशीच दयनीय अवस्था झाली असून निघोज परिसरातील शेतकऱ्यांचे एकूण कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. शासनाने तातडीने सर्वेक्षण करून नुकसानभरपाई जाहीर करावी, अशी एकमुखी मागणी शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.

योगेश खाडे

योगेश खाडे पाटील हे स्टार वन न्युज मराठी चे जुन्नर तालुक्यातील एक अनुभवी पत्रकार आहे ✨ जिथे अन्याय होत असेल तिथे त्यांना मदत करण्याचे काम योगेश खाडे करताना दिसतात

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!