
Updated by स्टार वन न्युज मराठी ™
२४ मार्च २०२६
सातारा : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) आज केलेल्या यशस्वी सापळा कारवाईत तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील गुणनियंत्रण विभागाचे कृषी अधिकारी युवराज अन्याबा काटे (वय ५४) यांना ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले.

तक्रारदार (वय ३५) यांची खत व औषधे निर्मिती करणारी कंपनी असून, उत्पादित मालाची तपासणी कृषी विभागाकडून केली जाते. आरोपी युवराज काटे यांनी तपासणीदरम्यान कंपनीच्या उत्पादनांविरोधात नकारात्मक अहवाल न देण्यासाठी सुरुवातीला ८० हजार रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सातारा येथे तक्रार दाखल केली.
तक्रारीची पडताळणी करताना पंचासमक्ष आरोपीने तडजोडीअंती ५० हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार २३ मार्च २०२६ रोजी सापळा रचण्यात आला. यावेळी आरोपीने पंचासमक्ष ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताच पथकाने त्याला ताब्यात घेतले.
कारवाईदरम्यान आरोपीकडून टाटा इंडिका व्हिस्टा (MH 11 BH 6609) वाहन, विविध कागदपत्रे, एटीएम कार्डे तसेच ५,९३० रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. आरोपीचा मोबाईलही जप्त करण्यात आला असून, त्याच्या घराची झडती घेण्यासाठी पथक रवाना झाले आहे.
या प्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, गुन्हा नोंद होताच आरोपीला अटक करण्यात येणार आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक सुप्रिया गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार गणेश ताटे, निलेश राजपुरे, विक्रमसिंह कणसे, अजयराज देशमुख, सागर कदम यांच्या पथकाने केली. तपास पोलीस निरीक्षक सुनील पाटील करत असून, उपअधीक्षक राजेश वाघमारे यांचे पर्यवेक्षण आहे.