
रविवार, दि. ०१ फेब्रुवारी ,२०२६.
सध्याच्या परिस्थितीत भुसावळ–मुंबई दरम्यान अनेक लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्या धावत असल्या, तरी त्यात जळगाव जिल्ह्यातील प्रवाशांना कधीच हक्काची जागा मिळत नाही.
सध्या भुसावळहून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मुंबई गाठण्यासाठी अनेक टप्प्यांत प्रवास करावा लागत असल्यामुळे वेळ, पैसा आणि मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.
त्यामुळे भुसावळ–इगतपुरी मेमूने प्रवास करणारे प्रवासी इगतपुरी येथे उतरतात. त्यानंतर तेथून दुसरी रेल्वे, बस किंवा खासगी वाहनाने कसारा गाठतात. कसाऱ्याहून पुढे मुंबईसाठी लोकल रेल्वे पकडून प्रवासाचे नियोजन केले जाते. या टप्याटप्प्याच्या प्रवासामुळे गाड्या बदलताना मोठी तारेवरची कसरत करावी लागते.
अनेकदा वेळेचे गणित बिघडते, आर्थिक भारही वाढतो. भुसावळहून सुटणारी मेमू रेल्वे थेट कसारापर्यंत चालविण्यात आली, तर भुसावळसह जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, मनमाड तालुक्यांसह आणि नाशिक जिल्ह्यातील प्रवाशांना अनारक्षित आणि परवडणारी मुंबईची थेट जोडणी मिळू शकणार आहे. विशेषतः विद्यार्थी, नोकरदार, छोटे व्यावसायिक आणि रोजंदारीवर काम करणाऱ्या प्रवाशांसाठी ही मोठी सोय ठरणार आहे.
आरक्षित तिकिटे न मिळाल्याने किंवा गाड्यांची गैरसोय झाल्याने अनेकदा प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागतो.
भुसावळ–कसारा मेमू सेवा सुरू झाल्यास उत्तर महाराष्ट्र आणि मुंबई यांमधील दळणवळण अधिक सुलभ व गतिमान होईल, असा विश्वास प्रवासी व्यक्त करीत आहेत.




