
Updated at: 24 Sep 2025
Published by स्टार वन न्युज मराठी वृत्तसेवा
मुंबई : राज्यभरात द्रुतगती मार्गाच्या निर्मिती बरोबर आता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ सौरऊर्जा निर्मितीसाठी देखील ओळखले जाणार आहे. हिंदु ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धीमहामार्गाच्या(Samruddhi highway) बुलढाणा येथील कांरजालाड व वाशिम (Washim) जिल्ह्यातील मेहकर इंटरचेंज येथील सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झाला आहे. सौरऊर्जा (Solar) निर्मितीमुळे समृद्धी महामार्ग हा देशातील पहिलाच पथदर्शी प्रकल्प ठरला आहे. पहिल्या टप्प्यात समृद्धी महामार्गावरील बुलढाण्यातील तालुका कांरजालाड व वाशिममधील तालुका मेहकर, येथे सौरऊर्जा प्रकल्पाची स्थापित क्षमता 9 मेगावॅट आहे. त्यापैकी कांरजालाड येथील 3 मेगावॅट व मेहकर येथील प्रकल्पातून 2 मेगावॅट वीज निर्मितीस सोमवारी प्रारंभ झाला. त्यामुळे, महामार्गावर सौर ऊर्जेच्या निर्मित्ती प्रकल्पाला आता गती मिळणार आहे.

नागपूर व मुंबईला जोडणारा हिंदु ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा 701 कि.मी लांबीच्या द्रुतगती मार्गावरुन आतापर्यंत सव्वा दोन कोटीहून अधिक वाहनांनी प्रवास केला आहे. समृद्धी महामार्गाच्या आखणीपासूनच वेगवान प्रवासाबरोबर सौरऊर्जा निर्मितीचे उद्दिष्ट महामंडळाने आखले होते. समृद्धी महामार्गाच्या इंटरचेंजवर 204 मेगावॅट क्षमतेच्या सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्याचा आराखडा निश्चित करण्यात आला असून त्यादृष्टीने पावले उचलली जात आहेत.
पहिल्या टप्प्यात समृद्धी महामार्गावरील बुलढाण्यातील तालुका कांरजालाड व वाशिममधील तालुका मेहकर, येथे सौरऊर्जा प्रकल्पाची स्थापित क्षमता 9 मेगावॅट आहे. त्यापैकी कांरजालाड येथील 3 मेगावॅट व मेहकर येथील प्रकल्पातून 2 मेगावॅट वीज निर्मितीस सोमवारी प्रारंभ झाला. सौरऊर्जा निमितीच्या माध्यमातून महामंडळाला पथकराव्यतिरिक्त उत्पन्नाचा नवीन स्त्रोत उपलब्ध झाला आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळांची विशेष उद्देश वाहन कंपनी महासमृद्धी रिन्युएब्ल एनर्जी लि. व महावितरण यांच्या दरम्यान सन 2022 मध्ये झालेला करारान्वये या विजेची विक्री करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री सौरकृषी वाहिनी योजना 1 अंतर्गत निविदा प्रक्रियेत भाग घेत महामंडळाने प्रति युनिट रु. 3.05 पैसे दर दिला होता. “महामंडळांच्या वाटचालीत हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. केवळ समृद्धी महामार्गाच नाही तर इतर प्रस्तावित महामार्गाच्या इंटरचेजवर सौरऊर्जा प्रकल्प राबविण्याचा विचार आहे. सौरऊर्जा निर्मितीच्या माध्यमातून कार्बन क्रेडिट हे देखील महामंडळांच्या खात्यात जमा होणार असून लाभ हा पायाभूत प्रकल्पासाठी कर्ज घेण्यासाठी होईल” असे महामंडळाचे सह व्यवस्थापकीय संचालक मनुज जिंदल यांनी संगितले.
दरम्यान, महामंडळांचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली, सह व्यवस्थापकीय संचालक मनुज जिंदल यांच्या मार्गदर्शनात मुख्य महाव्यवस्थापक (पर्यावरण) नरेंद्र टोके, मुख्य वित्त अधिकारी श्रीधर मच्छा, मुख्य अभियंता दिपक सोनटक्के, कार्यकारी अभियंता भूषण मालखंडाळे, कार्यकारी अभियंता सतीश आकोडे व कार्यकारी अभियंता नितीन झाडबुके यांनी सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित केला.
स्टार वन न्युज मराठी वृत्तसेवा ✍️ ✍️