Rohit Pawar : मराठी विरुद्ध अमराठी वाद निर्माण केलाय, राज ठाकरेंना आता भाजपचा चेहरा कळला असेल; रोहित पवारांचा निशाणा

Rohit Pawar : भाजपने हा लढा बिहार आणि मुंबई महापालिका इलेक्शनसाठी केला आहे, असा आरोप देखील रोहित पवार यांनी केला आहे.
Rohit Pawar : अमराठी व्यापाऱ्यांच्या शक्तीप्रदर्शनाला प्रत्युत्तर म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आज मीरा-भाईंदर शहरात मोर्चा (Mira Bhayandar MNS Morcha) काढण्यात येणार आहे. मात्र, पोलिसांनी (Police) या मोर्चाला परवानगी नाकारली असून प्रतिबंधात्मक कारवाईला सुरुवात केली आहे. पोलिसांनी सोमवारपासून मनसे आणि ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना नोटिसा देण्यास सुरुवात केली होती. मंगळवारी पहाटे साडेतीन वाजता मोठ्या फौजफाट्यासह पोलिसांनी मनसे नेते अविनाश जाधव (Avinash Jadhav) यांचे निवासस्थान गाठले आणि त्यांना ताब्यात घेतले. तर अविनाश जाधव यांच्यासह अनेक मनसे पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आता यावरून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी जोरदार हल्लाबोल केलाय.
नेमकं काय म्हणाले रोहित पवार?
रोहित पवार म्हणाले की, पर प्रांतीय व्यापाऱ्यांना तुम्ही मोर्चाला परवानगी देतात. मात्र, मराठी माणसाला परवानगी देत नाहीत, ही अशी भूमिका प्रशासन घेत आहे. हिंदी सक्ती विरोधात हा लढा होता. मात्र, भाजपने हा लढा बिहार आणि मुंबई महापालिका इलेक्शनसाठी केला आहे. मराठी विरुद्ध अमराठी असा वाद निर्माण केला आहे. ही दुटप्पी भूमिका आहे. राज ठाकरे यांना भाजपचा खरा चेहरा कळला असेल. ते आता कोणता निर्णय घेतात हे बघावे लागेल, अशी प्रतिक्रिया रोहित पवारांनी दिली आहे.
मनसेचे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर, मनसे नेते प्रकाश महाजन आणि सरचिटणीस वैभव खेडेकर हे खेड तहसील कार्यालयाबाहेर धरणे आंदोलनाला बसणार आहेत. अविनाश जाधव यांना तातडीने सोडण्याची मागणी करत हे आंदोलन करण्यात येणार आहे. या संदर्भात बोलताना प्रकाश महाजन म्हणाले, “आज पहाटे साडेतीन वाजता आमच्या पक्षाचे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी अटक केली. शासनाच्या या दडपशाहीविरोधात, मी आणि आमचे सरचिटणीस वैभव खेडेकर खेड येथील तहसील कार्यालयासमोर निदर्शने करणार आहोत,” अशी माहिती त्यांनी दिली.